anupam kher got scrutinized for keeping dhoop in luggage : बॉलीवूडमधील अभिनेते अनुपम खेर सध्या त्यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अनुपम खेर यांनी आतापर्यंत ५०० हून अधिक चित्रपट केले आहेत आणि ते अजूनही त्यांच्या कलाकृतींद्वारे लोकांचे मनोरंजन करत आहेत.
अनुपम खेर कामातून ब्रेक घेतात आणि कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी बाहेर जातात. परंतु, अशाच एका प्रवासादरम्यान अनुपम खेर यांना धक्का बसला होता. अनुपम खेर यांनी अलीकडेच पत्नी किरण खेर यांच्याबरोबर अमेरिकेत प्रवास करतानाचा एक विनोदी आणि थोडासा धक्कादायक किस्सा शेअर केला. अनुपम खेर यांनी या घटनेदरम्यान त्यांच्या पत्नीच्या प्रतिक्रियेबद्दलही सांगितले. ही घटना अनेक वर्षांपूर्वीची आहे, जेव्हा ९/११ च्या हल्ल्यानंतर अनुपम खेर आणि त्यांची पत्नी किरण खेर एका नाटकासाठी अमेरिकेला गेले होते.
अगरबत्तीमुळे अनुपम खेर आले होते अडचणीत
जेव्हा अनुपम खेर आणि किरण खेर लॉस एंजेलिस विमानतळावर होते, तेव्हा त्यांच्या सामानात असलेल्या काही सामान्य गोष्टीमुळे डिटेक्टरने आवाज काढायला सुरुवात केली. खरंतर, अनुपम खेर यांनी नकळत त्यांच्या शेव्हिंग किटमध्ये अगरबत्ती ठेवली होती. अभिनेत्याने राज शमानीच्या पॉडकास्टला सांगितले होते, “एखाद्या दिवशी… अगरबत्ती आहे ना? धूप, अगरबत्ती… मी ती शेव्हिंग किटमध्ये ठेवली असेल.” अनुपम खेर आणि किरण खेर यांना लॉस एंजेलिसहून सॅन फ्रान्सिस्कोला जायचे होते. किरण खेर यांनी सुरक्षा तपासणी सहजपणे पार केली, परंतु अनुपम खेर यांना थांबवण्यात आले.
अनुपम खेर यांना त्यांच्या सामानासह थांबवण्यात आले आणि सर्व सामान एक-एक करून तपासण्यात आले. त्यांनी अनुपम खेर यांचे शेव्हिंग किट तपासले तेव्हा त्यांना अगरबत्ती आढळली. पण, अनुपम खेर स्वतः किटमध्ये काय ठेवले होते ते विसरले होते. त्यांनी सांगितले, “मी काय ठेवले होते ते मी पूर्णपणे विसरलो होतो, म्हणून त्यांनी ते बाहेर काढले आणि त्याचा वास येऊ लागला. अधिकाऱ्याने त्यांच्या सहकाऱ्याला विचारले की मी जे विचार करत होतो तेच आहे का? त्यांनीही त्याचा वास घेतला आणि हो, तेच आहे असे म्हटले.” तातडीने कारवाई करण्यात आली आणि अनुपम खेर यांना बाजूला येऊन हात वर करावे लागले.
चौकशी सुरू झाली आणि अनुपम खेर यांना विचारण्यात आले की हे काय आहे? पण, त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. त्यांनी सांगितले की मला माहीत नाही. अनुपम खेर यांनी सांगितले की त्यांची पत्नी किरण खेर यांनी प्रकरण न समजताच आपल्या भावना व्यक्त केल्या आणि अनुपम खेर यांच्यावर रागावू लागल्या, “तुम्ही चरस घेऊन फिरत आहात?.” अनुपम खेर हसून म्हणाले की, मला वाटले की जर मी वाचलो तर मी बाहेर जाऊन तिला घटस्फोट देईन. त्यांनी सांगितले की, त्यांचं डोकं नव्हतं चालत कारण किरण खेर सतत म्हणत होत्या- तुम्ही काय घेऊन फिरत आहात, तुम्ही वेडे झाला आहात. पण, नंतर एका बांगलादेशी व्यक्तीने त्यांना मदत केली; कारण त्यांनी लगेच ओळखले की ही अगरबत्ती आहे, जी पूजेसाठी वापरली जाते.