छोट्या पडद्यावरील अनुपमा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेत अनुपमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली ही कायमच चर्चेत असते. रुपाली ही छोट्या पडद्यावरील सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. रुपालीने यापूर्वी अनेक मालिकेत काम केले आहे. मात्र अनुपमा या मालिकेमुळे तिला वेगळीच ओळख मिळाली आहे. रुपाली ही आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली असली तरी तिचे वडील अनिल गांगुली यांना तिने अभिनय क्षेत्रात यावे, असे अजिबात वाटत नव्हते, असा खुलासा तिने एका मुलाखतीदरम्यान केला.

रुपालीने नुकतंच एका प्रसारमाध्यमाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिच्या करिअरबद्दल, कुटुंबाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी ती म्हणाली, “माझे वडील अनिल गांगुली हे फार मोकळ्या मनाचे होते. ते माझ्यावर फार प्रेम करायचे. पण प्रत्येक वडिलांप्रमाणे ते मला संध्याकाळी ७ च्या नंतर घराबाहेर पडू द्यायचे नाही. मी संध्याकाळी बाहेर जाऊ नये”, अशी त्यांची इच्छा होती.

“माझे बाबा असे का करतात, असा प्रश्न मला अनेकदा पडायचा. पण आम्ही जसे जसे मोठे झालो तसं आम्हाला समजले की ते सर्व खबरदारी आमच्या सुरक्षेसाठी होती. विशेष म्हणजे मी अभिनय क्षेत्रात यावे यासाठी त्यांचा कायमच विरोध होता. मी जेव्हा पहिल्यांदा त्यांना सांगितले होते की, मला अभिनयक्षेत्रात यायचे आहे, तर तेव्हा ते माझ्यावर नाराज झाले होते”, असेही रुपालीने सांगितले.

“ते मला म्हणाले होते की, जर देवाने तुम्हाला मेंदू दिला आहे, तर एखादे चांगले आणि योग्य काम करा. अभिनय करुन काय होणार आहे. त्यावेळी मालिकांची संख्या ही फार कमी होती. फक्त चित्रपटांची निर्मिती होत होती”, असेही रुपाली गांगुली म्हणाली.

रुपाली गांगुलीचे वडील अनिल गांगुली हे ७० ते ८० च्या दशकातील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. त्यांनी कोरा कागज, तपस्या सारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. यासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाले आहेत.