Apoorva Mukhija Talks about India’s Got Latent : ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमामुळे समय रैना, रणवीर अलहाबादिया आणि अपूर्वा मुखिजा ही मंडळी चर्चेत आली होती. या शोमधील त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर सोशल मीडियावर तिघांनाही मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. अशातच अपूर्वाने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने या कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिच्या अडचणी कशा वाढल्या याबद्दल सांगितलं आहे; तर यामुळे तिला तिचं घरही सोडावं लागल्याचं तिने सांगितलं आहे.
अपूर्वा मुखिजाने ‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं आहे. ती म्हणाली, “मला नोटीस देण्याकरिता माझ्या घरी पोलिस आले होते. त्यानंतर मी ज्या बिल्डिंगमध्ये राहते, तिथले लोक मला कोणाहीमुळे बिल्डिंगमध्ये पोलिस येणं चुकीचं आहे आणि या अशा कारणांमुळेच आम्ही एकट्या मुलीला, बॅचलर्सला राहण्यासाठी घर देत नाही असं म्हणाले होते. त्यामुळे माझ्या घरमालकाने मला घर सोडायला सांगितलं. एक वर्षापासून मी त्या घरामध्ये राहात होते.”
अपूर्वाने यासह मागे एप्रिल महिन्यात एका ब्लॉगमधून असंही सांगितलं होत की, ‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिला धमक्यांचे मेसेज यायचे, ज्यामुळे तिला घरी जाण्याचीही भीती वाटायची. ती म्हणाली, “मला इन्स्टाग्रामवर धमक्यांचे खूप सारे मेसेज यायचे.” दरम्यान, अपूर्वा कॉमेडियन समय रैनाचा यूट्यूब शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये झळकली होती. यावेळी तिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकांनी तिला प्रचंड ट्रोल केलं होतं.”
अपूर्वा मुखिजाबद्दल बोलायचं झालं तर ती एक प्रसिद्ध यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. ती द रिबेल किड या नावानेही ओळखली जाते. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमधील तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती चर्चेत आली. सध्या ती करण जोहरच्या ‘द ट्रेटर्स’ या कार्यक्रमात झळकत आहे. यासह अपूर्वा यापूर्वी खूशी कपूर व इब्राहिम अली खान यांच्या ‘नादानियां’ या चित्रपटात झळकली होती. यामधून तिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. अपूर्वा आता तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यांमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.