Archana Puran Singh gets emotional as she recalls struggling days : ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या अर्चना पूरण सिंह यांनी अलीकडेच काही खुलासे केले आहेत. एका ब्लॉगमध्ये अभिनेत्रीने त्यांच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितले आहे, ज्यात त्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी घर सोडले आणि मुंबईत येऊन अभिनेत्री कशी झाली याचा समावेश आहे.

अर्चना यांचा मुलगा आर्यमनने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारताना दिसत आहे. परमित यांच्याबरोबरच्या वैवाहिक जीवनातील अडचणींपासून ते त्यांच्या संघर्षमय टप्प्यापर्यंत आणि इतर अनेक गोष्टींबद्दल अभिनेत्रीने सर्व काही उघडपणे सांगितले. अनेकांचे लक्ष वेधून घेतलेल्या क्षणांपैकी एक म्हणजे जेव्हा त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या संघर्षांबद्दल सांगितले.

अर्चना म्हणाल्या, “जेव्हा मी अ‍ॅक्टिंग शिकण्यासाठी मुंबईत आले, तेव्हा मला एक मालिका मिळाली, जिथे मला फक्त अभिनयच नाही तर कॉमेडीही करायची होती. तिथे एक सीन होता जिथे मला कॉमेडी करायची होती. मी तो सीन करत होते तेवढ्यात दिग्दर्शकाने मला थांबवले आणि सांगितले की चेहरे बनवणे म्हणजे कॉमेडी नाही. त्यांनी मला इतरांना पाहून कॉमेडी काय आहे ते शिकायला सांगितले. मी ते पाहिले, त्याचे विश्लेषण केले आणि त्यातून शिकले.”

त्या पुढे म्हणाल्या, “प्रत्येकाला वाटतं की मी नेहमीच हसत असते, पण त्यांना माहीत नाही की मी काय अनुभवलं आहे. जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईत आले तेव्हा मला कपडे कसे घालायचे हे माहीत नव्हते. मी शिक्षित होते, पण मला स्टाईल माहीत नव्हती.”

जेव्हा मी मुंबईतील जीवन कसे असते हे पाहिले, तेव्हा मी देहराडूनला परत गेले आणि माझ्या वडिलांना सांगितले की मला अभिनेत्री व्हायचे आहे. त्यानंतर माझ्या वडिलांनी मला त्यांच्या मित्रासह आणि त्यांच्या मुलीसह एका सुटकेससह मुंबईला पाठवले. ती स्वप्नांनी भरलेली सुटकेस होती, पण तो कौटुंबिक मित्र फक्त एका आठवड्यात देहराडूनला परतणार होता.

अर्चना यांनी त्यांच्या आयुष्यातील काही कठीण टप्प्यांबद्दलही सांगितले. त्यांनी दोन टप्प्यांचा उल्लेख केला – एक, जेव्हा त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी आल्या आणि दुसरा जेव्हा त्यांचा मुलगा आर्यमनचा मोठा अपघात झाला होता.

अर्चना पूरण सिंह सध्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या नेटफ्लिक्सवरील कार्यक्रमात दिसतात. अनेक कलाकार, क्रिकेटरदेखील पाहुणे म्हणून या कार्यक्रमात सहभागी होताना दिसतात.