क्रिकेटपटू आणि राजकारणी नवज्योत सिंह सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले आहेत. पद सोडल्यानंतर ते पुन्हा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परीक्षक म्हणून येणार का? अशा चर्चा सोशल मीडियावर होत आहे. अर्चना पूरण सिंग ‘द कपिल शर्मा शो’ सोडणार? आणि नवज्योत त्यांना रिप्लेस करणार अशा चर्चा तूफान रंगत आहेत. यावर आता अर्चना यांनी प्रतिक्रिया दली आहे. तर, पूलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाठराखण केल्याबद्दल नवज्योत सिंग सिद्धू यांना शो मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर सिद्धू यांची जागा अर्चना पूरण सिंग यांना देण्यात आली होती.
नवज्योत यांच्या राजीनाम्यानंतर त्याच्या शोमध्ये परत येणायविषयी सोशल मीडियावर असंख्य मीम्स व्हायरल झाले आहेत. अर्चना यांनी काही मीम्स त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यांनी हे मीम्स शेअर करत ‘किस्सा खुर्ची का’, असे कॅप्शन दिले आहे. हे मीम्स पाहून अर्चना चिंतेत असल्याचं नेटकऱ्यांना वाटतंय आणि त्यामुळे अर्चना सिंग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मला माझ्या खुर्चीची काहीच काळजी नाही आणि मी या गोष्टींचा अजिबात गांभीर्याने विचार करत नाही. नवज्योत सिंग सिद्धू जर पुन्हा या शोमध्ये खरंच परत येत असतील, तर ज्या गोष्टी मी या शोमुळे नाकारल्या होत्या, त्यावर मला लक्ष देता येईल.”
असं म्हटलं जातं की, ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये अर्चना हसण्याशिवाय काहीच करत नाही. या बद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “कपिलच्या शोचे लेखक खूप विनोदी आणि मजेदार स्क्रिप्ट घेऊन येतात, त्यामुळे मी माझे हसणे थांबवू शकत नाही. दररोज असे मजेशीर जोक सुचणे आणि १० वर्ष हा शो सतत सुरू ठावणे हे खरोखरच खूप कठीण काम आहे.”
त्या पुढे सांगतात, “ज्यांना असे वाटते की मी काहीच काम करत नाही, त्यांनी सेटवर येऊन बघा..६-७ तास त्याच पोझिशनमध्ये बासणे सोपे नसते. मला ४-५ तास सोफ्यावर बसावं लागते, प्रत्येक विनोद नीट ऐकावा लागतो आणि त्यावर योग्य प्रतिक्रिया द्यावी लागते. कधी कधी एखादा प्रोजेक्ट पैश्यासाठी नाही तर त्यातून मिळणाऱ्या आनंदासाठी केला जातो आणि हेच मला कपिल शर्मा शो केल्याने मिळते,” असं त्या म्हणाल्या.