विनोद सातव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्याही चित्रपटाची निर्मिती सुरू होते तो काळ आणि तो चित्रपट प्रदर्शित होतो तो काळ या मधल्या काळात (हा काळ जरी फार मोठा असला-नसला तरीही..) झालेली सामाजिक स्थित्यंतरे, भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी, प्रेक्षकांच्या मानसिकतेत झालेले सूक्ष्म बदल, इंटरनेटवरून मनोरंजनाचा वाहणारा अफाट मोठा प्रवाह अशा सर्व घटकांमुळे चित्रपट निर्मात्यांनी आधी मांडलेली आणि नंतर बदललेली व्यवसायिक समीकरणं हा खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे. या अभ्यासासाठी लागणारी ‘लिटमस टेस्ट’ म्हणून २०१८ मधील मराठी चित्रपटांच्या प्रवासाचा आढावा घेता येईल.

मराठी चित्रपटांसाठी यंदाचे वर्ष दणदणीत यश मिळवून देणारे ठरले आहे. दरवर्षी मराठीत साधारणत: शंभराहून अधिक चित्रपट प्रदर्शित होतात, मात्र त्यातील मोजक्याच म्हणजे अगदी हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढय़ाच मराठी चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळत आले आहे, यंदा मात्र अनेक चित्रपटांना चांगले ‘ओपनिंग’ मिळाले आणि काही चित्रपटांनी कोटींची उड्डाणे घेतली. यामुळे २०१८ हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीला ‘अच्छे दिन’ आणणारे ठरले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

यंदाच्या वर्षांची सुरुवात जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात अमेय खोपकर निर्मित आणि संजय जाधव दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा’ या ‘फार्सिकल कॉमेडी’ चित्रपटाने झाली. दीपक पाटील दिग्दर्शित ‘बारायण’ हा एक वेगळ्या विषयावरचा चित्रपट होता. फेब्रुवारी महिन्यात सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘आपला मानूस’ने रसिकांना भुरळ घातली, डॉ. विवेक बेळे यांचे बहारदार लेखन, नाना पाटेकर, सुमित राघवन, इरावती हर्षे यांच्या यामध्ये भूमिका होत्या. सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘गुलाबजाम’मध्ये सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर यांचा अभिनय, पाककलेचा-मानवी नातेसंबंधांचा वेगळा विषय आणि झी स्टुडिओने प्रदर्शनापूर्वी थिएटरमध्ये ‘गुलाबजाम’ वाटत केलेले हटके प्रमोशन यामुळे चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. सई ताम्हणकर, शरद केळकर या जोडीचा ‘राक्षस’, आणि मुक्ता बर्वे, प्रिया बापटचा ‘आम्ही दोघी’ हे चित्रपट समीक्षकांची पसंती मिळवून गेले. मार्च महिन्यात वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरेचा ‘व्हॉट्सप लग्न’ आला. ‘ख्वाडा’ फेम भाऊ राव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘बबन’ या सामाजिक विषयावरील चित्रपटानेही प्रेक्षकांची मने जिंकली. जानेवारी ते मार्च या तिमाहीत २९ चित्रपट प्रदर्शित झाले.

विजू माने दिग्दर्शित ‘शिकारी’ आणि रवी जाधव यांच्या ‘न्यूड’ या दोन चित्रपटांनी एप्रिल महिना गाजवला. धकधक गर्ल माधुरी दीक्षितला मराठी चित्रपटात बघण्याची अनेकांची ‘बकेट लिस्ट’ मे महिन्यात करण जोहरने पूर्ण केली. याच महिन्यात विजू माने दिग्दर्शित ‘मंकी बात’ हा धम्माल बालचित्रपट, प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘सायकल’ यांची चर्चा झाली. जून महिन्यात ‘मस्का’, ‘र्फजद’ आणि ‘बेधडक’ असे वेगवेगळ्या ‘जॉनर’चे तीन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले. ‘मस्का’ लेखक, अभिनेता प्रियदर्शन जाधवने केलेली हटके मांडणी यामुळे लक्षात राहिला. तर ऐतिहासिक पाश्र्वभूमी असलेला ‘र्फजद’ रसिकांना आवडला. याच दिवशी हिंदीतील बहुचर्चित ‘वीरे दि वेडिंग’सुद्धा प्रदर्शित झाला होता तरीही मराठी प्रेक्षक ‘र्फजद’ला गेले. ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारित ‘झिपऱ्या’ने समीक्षकांची मनापासून दाद मिळविली. एप्रिल, मे, जून या सुट्टय़ांच्या तीन महिन्यांत तब्बल ३९ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले.

बॉलीवूडला नेहमीच मराठीतील चांगल्या विषयांचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. अनुराग कश्यप प्रस्तुत आणि ‘रिंगण’फेम मकरंद माने दिग्दर्शित ‘यंग्राड’, अक्षय कुमार प्रस्तुत गीतकार स्वानंद किरकिरेचे अभिनयातील पदार्पण असलेला ‘चुंबक’ हे बहुचर्चित चित्रपट आले. मंगेश जोशीचा बहुचर्चित, विविध पुरस्काराने सन्मानित अरुण गिरी, ओम भूतकर यांच्या भूमिका असलेल्या ‘लेथ जोशी’ सह जुलै महिन्यात १५ चित्रपटांचा पाऊ स पडला पण प्रेक्षकांनी या पावसात न जाता घरीच बसणे पसंत केले. अभिनेता सुबोध भावेची निर्मिती क्षेत्रात पाऊ ल असलेल्या ‘पुष्पक विमान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन वैभव चिंचाळकर यांनी केले होते.

‘ट्रकभर स्वप्न’, ‘सविता दामोदर परांजपे’ ‘टेक केअर गुड नाइट’ हे चित्रपट आपल्या वेगळेपणामुळे चर्चेत राहिले. सप्टेंबर महिन्यात एकाच दिवशी ‘परी हू मै’ अशा हिंदी नावाचा,‘पार्टी‘ अशा इंग्रजी नावाचा आणि बोगदा हे मराठी चित्रपट आले. त्या नंतर घर आणि नात्यांची गोष्ट सांगणारा अभिनेत्री रिमा लागू यांचा शेवटचा चित्रपट ‘होम स्वीट होम’ आला, या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता, लेखक हृषीकेश जोशी यांनी केले. या सगळ्याच चित्रपटांचा प्रदर्शित झालेल्या महिन्यांनुसार उल्लेख करण्यामागचे कारणच हे की यातून मराठी प्रेक्षकांचा कल कशाकडे आहे हे लक्षात येईल.

या वर्षांच्या अखेरच्या तीन महिन्यांत ‘बॉईज २’ ने तिकीटबारीवर अपेक्षित यश मिळवले तर अशोक सराफ, शिवाजी साटम, सतीश वरून आळेकर, दिलीप प्रभावळकर या ज्येष्ठ कलाकारांच्या प्रमुख भूमिका असूनही महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘मी शिवाजी पार्क’हा चित्रपट चर्चेत राहिला पण यशस्वी ठरला नाही. तृप्ती भोईर यांचा ‘माझा अगडबम’ हा सिक्वलही फारसे यश मिळवू शकला नाही.

नोव्हेंबर २०१८ हा महिना मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सुवर्णपान ठरणार यात शंका नाही. या महिन्यात सलग तीन शुक्रवार, सुपरहिट चित्रपटांचे ठरले. दिवाळीत बॉक्स ऑफिसवर हिंदीतील अमिताभ बच्चन, अमीर खान यांचा बिग बजेट ‘ठग्ज ऑफ हिदुस्थान’सारखा चित्रपट असताना ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ने बाजी मारली, त्यानंतरच्या शुक्रवारी सुधाकर रेड्डी दिग्दर्शित आणि नागराज मंजुळे यांची निर्मिती व अभिनय असलेल्या ‘नाळ’ने प्रेक्षकांशी नाळ जोडण्यात यश मिळविले. तर प्रवीण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने मराठी चित्रपटाच्या यशाची हॅट्ट्रिक साजरी केली. डिसेंबर महिनासुद्धा मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वपूर्ण ठरला. सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई पुणे मुंबई ३’ ने प्रेक्षकांची मने जिंकली. एखाद्या चित्रपटाचा तिसरा भाग येण्याची ही मराठीत पहिलीच वेळ आहे. तर ‘लय भारी’नंतर अभिनेता रितेश देशमुख पुन्हा एकदा ‘माऊ ली’मधून प्रेक्षकांसमोर आला.

सर्वात यशस्वी वर्ष

मराठी चित्रपटसृष्टीसाठी २०१८ हे वर्ष अलीकडच्या काळातील सर्वात यशस्वी वर्ष म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण यापूर्वी, एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला तर पुढील काही महिने नवीन चित्रपटाला सरासरी यश मिळायचे नाही. मात्र यंदा ‘येरे येरे पैसा’, ‘आपला मानूस’, ‘गुलाबजाम’, ‘बबन’, ‘र्फजद’, ‘बॉईज २’, ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘मुंबई पुणे मुंबई ३’ यासह अनेक  चित्रपटांनी पैसा वसूल व्यवसाय केला. याविषयी बोलताना सादिक चितळीकर (वितरक, झी स्टुडिओ) म्हणाले, ‘वितरक, एक्झीबीटर्स, थिएटर हे आपल्या व्यवसायासाठी हिंदी चित्रपटांवर अवलंबून असतात. मात्र यंदा पहिल्यांदाच त्यांना हिंदी नव्हे तर मराठीने चांगला व्यवसाय दिला, हे पहिल्यांदाच घडले. तसेच नोव्हेंबर महिन्यात सलग तीन मराठी चित्रपट सुपरहिट ठरले, अशी यशाची हॅट्ट्रिक होण्याची घटना यापूर्वी मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतसुद्धा घडलेली नाही. ‘नाळ’ चित्रपटाला प्रेक्षकांची मागणी आहे हे लक्षात घेऊ न विदर्भातील काही छोटय़ा गावातील थिएटर चालकांनी त्यांच्या तंत्रज्ञानात बदल केला ही मोठी गोष्ट होती.

हिंदी कलाकार नाकारले

मराठी चित्रपटसृष्टीत यावर्षी काही हिंदी कलाकारांची एन्ट्री झाली. यामध्ये धक धक गर्ल माधुरी दीक्षित वगळता इतर कलाकारांच्या नशिबी यश आले नाही. गीतकार स्वानंद किरकिरे यांनी अक्षय कुमारची प्रस्तुती असलेल्या ‘चुंबक’ मधून मराठीत पदार्पण केले. ‘एक सांगायचंय’ या चित्रपटातून प्रतिभासंपन्न अभिनेता के. के. मेनन यांची एन्ट्री झाली मात्र ‘नाळ’ समोर हा चित्रपट फारसा टिकला नाही. ‘अबक’ नावाच्या चित्रपटात सुनील शेट्टी आणि तमन्ना भाटीया यांच्या भूमिका होत्या.

समन्वय, नियोजनाची आवश्यकता

चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे, अनेक बाबींचे नियोजन करण्याची गरज आहे,  ही गोष्ट यंदा पुन्हा एकदा जाणवली.  मराठीत साधारणपणे शंभराहून अधिक चित्रपट प्रदर्शित होतात यामुळे एका आठवडय़ात किमान दोन चित्रपट समोरासमोर येणार हे मान्य करावेच लागेल, अपवादात्मक स्थितीत तीन चित्रपट आले तर समजू शकते. एप्रिल आणि मे महिना हा सुट्टय़ांचा काळ असल्यामुळे चित्रपटसृष्टीसाठी हा ‘सुगीचा काळ’ म्हटला जातो. त्यामुळे या काळात मोठय़ा प्रमाणात चित्रपट प्रदर्शित होतात, तसेच झाले. नियोजन आणि समन्वयाच्या अभावी झालेली चित्रपटांची गर्दी आणि प्रेक्षकांची गर्दी याची त्रराशिके मात्र व्यस्त प्रमाणात मांडली गेली. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तब्बल ३९ सिनेमे आले, त्यातही ८ जून या एकाच दिवशी ८ चित्रपट प्रदर्शित झाले. तसेच यावर्षी एका अभिनेत्याचे किंवा अभिनेत्रीचे एकाच महिन्यात दोन – तीन चित्रपट आल्याचे बघायला मिळाले, यामुळे यातही सुसूत्रता येणे आजही गरजेचे वाटत असून त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.

(लेखक मराठी चित्रपटांचे सहनिर्माते, प्रस्तुतकर्ते आणि मार्केटिंग सल्लागार आहेत. )

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about good day to marathi films
First published on: 30-12-2018 at 01:52 IST