मानसी जोशी
उत्कृष्ट कथा हा लोकप्रिय कलाकृतीचा आत्मा मानला जातो. मनोरंजनविश्वात दर्जेदार साहित्यावर आधारित चित्रपट आणि मालिकांची निर्मिती करण्यात आली आहे. शेक्सपिअर, रस्किन बाँड, रवींद्रनाथ टागोर, शरदचंद्र चटोपाध्याय, पु.ल. देशपांडे, सुहास शिरवळकर यांच्यासारख्या महान लेखकांचे साहित्य नवोदित लेखक – दिग्दर्शकांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. चित्रपट, मालिकांनंतर आता तिसरा पडदाही साहित्याची कास धरताना दिसतो आहे. मूळ कथेला धक्का न लावता वेब माध्यमावर साहित्यावर आधारित आशयघन कलाकृतीची निर्मिती केली जात आहे..
उत्कृष्ट आणि दर्जेदार लिखाण असलेल्या कथा लेखक – दिग्दर्शकांना नेहमीच भुरळ घालत आल्या आहेत. ‘देवदास’, ‘परिणीता’, ‘राझी’, ‘हैदर’ हे कथा कादंबरीवर बेतलेले चित्रपट प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले. आता हाच ट्रेण्ड ओटीटी माध्यमावर रुजू होऊ पाहतो आहे. गेल्या पाच वर्षांत ओटीटी माध्यमाच्या उदयानंतर वाढत्या स्पर्धेमुळे चांगल्या आशयनिर्मितीची गरज निर्माण झाली आहे. इंग्रजीत ‘गेम ऑफ थ्रोन्स’मुळे आणि हिंदीत ‘सॅक्रेड गेम्स’च्या यशानंतर अनेक पुस्तकांवरून वेब सीरिजच्या निर्मितीचा ट्रेण्ड लोकप्रिय झाला. रस्किन बाँड, निल गिलमन, शेक्सपिअर, चेतन भगत, अरविंद अडिगा, नोवोनिल चॅटर्जी या लेखकांच्या पुस्तकांवर हिंदी तसेच प्रादेशिक वेब सीरिज निर्माण झाल्या आहेत. जगभरातील साहित्याचे महत्त्व जाणल्याने नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम यासारखे आघाडीचे ओटीटी स्पर्धक सध्या लोकप्रिय पुस्तके, कथा, कादंबऱ्या यांचे हक्क विकत घेत आहेत. वेब सीरिजमुळे मूळ कथा तसेच ते पुस्तकही लोकप्रिय होत असल्याने अधिक वाचकांपर्यंत पोहोचते आहे.
हॉलीवूडमध्ये अनेक दर्जेदार पुस्तकांच्या कथेवरून आशयघन वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. लोकप्रियतेचे सगळे उच्चांक मोडणारी ‘जीओटी’ म्हणजेच ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही इंग्रजी मालिका जॉर्ज आर.आर मार्टिन यांच्या ‘अ साँग ऑफ आईस अॅण्ड फायर’ या पुस्तकांवर आधारित आहे. अॅमेझॉन प्राइमवरील ‘टॉम क्लॅन्सीज जॅक रायन’ ही वेब सीरिज टॉम क्लॅन्सी यांच्या ‘रायनवर्स’ तर ‘१३ रीझन्स व्हाय’ ही मालिका जे. अशरच्या पुस्तकावरून प्रेरित आहे. ओटीटीसाठी आशयनिर्मिती करताना बहुतेवेळा पुस्तकाचेच शीर्षक वेब सीरिजला देण्यात येते. ‘हॅण्डमेड टेल’, ‘शार्प ऑब्जेक्ट्स’, ‘बिग लिटिल लाईज’, ‘ऑरेंज’, ‘गुड ओमेन्स’, ‘द मॅन इन द हाय कॅसल’, ‘सेक्स इन द सिटी’, ‘अमेरिकन गॉड’, ‘आय लव्ह डिक’ या वेब सीरिज ही त्याचीच काही ठळक उदाहरणे आहेत.
हॉलीवूडमधील हा ट्रेण्ड हिंदीतही मोठय़ा संख्येने दिसून येत आहे. नवाझुद्दिन सिद्दिकी, सैफ अली खान, पंकज त्रिपाठी यांच्या दर्जेदार अभिनयाने चार चाँद लागलेल्या नेटफ्लिक्सवरील ‘सॅक्रेड गेम्स’ ही वेब सीरिज विक्रम चंद्रा यांच्या ‘सॅक्रेड गेम्स’ या पुस्तकावर बेतलेली होती. या वेब मालिकेने तिसऱ्या पडद्यावर धुमाकूळ घातला. ही मालिका एवढी लोकप्रिय झाली की, लोकाग्रहास्तव दुसऱ्या भागाचीही निर्मिती करण्यात आली. ‘सॅक्रेड गेम्स’च्या यशानंतर हिंदीत कथा कादंबरीवरून वेब सीरिजची निर्मिती करण्याची लाटच आली आहे. बलोचिस्तानमधील चार गुप्तहेराच्या कारवायांची गोष्ट सांगणारी ‘बार्ड ऑफ ब्लड’ ही वेब सीरिजही बिलाल सिद्दिकी यांच्या ‘बार्ड ऑफ ब्लड’ या पुस्तकावर बेतलेली आहे. इमरान हाश्मीची प्रमुख भूमिका असलेल्या या वेब सीरिजला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. अंथरुणाला खिळलेले आईवडील, सततचा प्रेमभंग, लेखक बनण्याच्या ईष्र्येने सोडलेली नोकरी, तरीही लेखनात अपयशी ठरलेला नायक आपल्याच मृत्यूचे कंत्राट एका सराईत टोळीला देतो. ही रंजक कथा असलेली अॅमेझॉन प्राइमवरील ‘अफसोस’ या वेब सीरिजची निर्मिती ‘गोलपेर गोरु चांदे’ या मूळ बंगाली पुस्तकावरून प्रेरित आहे. इंग्रजीमध्येही ‘द काऊ ऑफ फिक्शन गोज टू द मून’ या नावाने हे पुस्तक प्रसिद्ध आहे. ‘अफसोस’ ही मालिका अभिनव आणि अनुराग कश्यपची बहीण अनुभूतीने दिग्दर्शित केली होती.
अनिल कपूरची निर्मिती असलेली ‘सिलेक्शन डे’ ही मालिका लोकप्रिय लेखक अरविंद अडिगा यांच्या कादंबरीवर आधारलेली आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रिया कुमार हिच्या ‘आय विल गो आऊट विथ यू – द फ्लाईट ऑफ लाईफटाईम’ या पुस्तकावरून ‘द फायनल कॉल’ या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. झी ५ वरील ‘परछाई’ ही वेब सीरिज रस्किन बाँड यांच्या ‘घोस्ट स्टोरीज’ पासून प्रेरित आहे. ‘द फरगॉटन आर्मी’ची कथा पीटर वॉर्ड फायेच्या पुस्तकावर आधारित आहे. लवकरच नेटफ्लिक्सची सलमान रश्दींच्या ‘द मिडनाईट चिल्ड्रेन’ या पुस्तकावर वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पुस्तकावर आधारित वेब सीरिजच्या निर्मितीच्या ट्रेंडकडे सिनेअभ्यासक तरण आदर्श सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात. पाश्चत्त्य साहित्य संस्कृतीकडून प्रेरणा घ्यायच्या नादात आपण भारतीय साहित्याकडे दुर्लक्ष करतो. आपले साहित्य दर्जेदार असून लेखकांनी त्याचा अभ्यास करावा. ओटीटी माध्यमामुळे लेखकांना संधी उपलब्ध झाल्या आहेत. उपेक्षित राहिलेल्या लेखकांची जागतिक स्तरावर दखल घतेली जाईल. यामुळे देशात आशयघन वेब सीरिज निर्माण होण्यास मदत होईल. अनेक ओटीटी माध्यमे नवीन कथेच्या शोधात आहेत. आणि पुस्तकावरून वेब सीरिजची निर्मिती करणे सोपे असल्याने हा ट्रेण्ड झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांची भयकथा असलेली ‘समांतर’ ही मॅक्स प्लेयरवरील वेब सीरिज सुहास शिरवळकरांच्या कथेवर आधारित होती. पुस्तकावर आधारित मालिकेचे दिग्दर्शन करताना दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी आपला अनुभव सांगितला. ‘मराठीत अनेक चित्रपट – मालिकांच्या कथा-कादंबरीवरून प्रेरित आहे. पुस्तकाची संहिता आवडल्याने दिग्दर्शक निर्माता त्याचा दृकश्राव्य माध्यमासाठी विचार करतो. ओटीटी माध्यमासाठी समांतर मालिका दिग्दर्शित करताना पुस्तकाचा मूळ गाभा तसाच ठेवून त्यातील कथेला संक्षिप्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कथा काळानुसार पुढे सरकते आणि प्रेक्षकांना पुस्तक वाचल्याचा आनंद मिळतो, असेही त्यांनी सांगितले.
भाडिपातर्फे २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर आधारित लेखक कमलेश सुतार यांच्या ‘३६ डेज’ या पुस्तकावर वेब मालिके ची निर्मिती केली जाणार आहे. या मालिकेच्या संहितेचे काम सुरू असून, ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. याविषयी बोलताना भाडिपाच्या सारंग साठय़ेने सांगितले की, ‘पुस्तक हे लेखकाला दिशा देण्याचे काम करते. पुस्तकातील संदर्भ, घटना यामुळे लेखकाला पटकथा लिहिणे सोपे जाते. पुस्तकामुळे दिग्दर्शक निर्मात्याला आशय पडद्यावर कसा मांडायचा, तो प्रेक्षकांना रुचेल का, या गोष्टींची कल्पना येते. कथा-कादंबऱ्यांचे मालिका आणि चित्रपटात रूपांतरण करण्याचा ट्रेण्ड अनेक वर्षांपूर्वीचा आहे. ‘सॅक्रेड गेम्स’, ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या लोकप्रिय वेब मालिका पुस्तकांवरच आधारित आहे. कोणत्याही कथेचे वेब सीरिजमध्ये रूपांतरण करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पुस्तकांवरून सीरिज करताना वास्तव आणि आभासी जगाचे भान ठेवावे लागते. पुस्तकातील कथा पडद्यावर प्रभावीपणे कशी मांडायची हे जास्त आव्हानात्मक असते. मूळ कादंबरीला धक्का पोहोचू न देता त्यातील नाटय़ जिवंत ठेवण्याचे आव्हान आमच्या टीमसमोर आहे. भाषणे, लेख, संवाद तसेच पत्रे संकलित केलेल्या पुस्तकांचा संदर्भ घेऊन पटकथा लिहिताना लेखकाला अडचणी येतात. तुलनेने वास्तव चित्रण, काल्पनिक कथा असे विषय असलेल्या पुस्तकावरून कथा लिहिणे सोपे काम असते. संवेदनशील विषय असलेल्या पुस्तकाची पटकथा लिहिताना व्यक्ती अथवा समूहाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते, असेही सारंगने स्पष्ट केले.
ओटीटी हे लेखकांसाठी व्यासपीठ
सध्या ओटीटीवरील वाढत्या स्पर्धेमुळे निर्माते चांगल्या कथेच्या शोधात आहेत. कथा- कादंबरीवर आधारित वेब सीरिजच्या निर्मितीमुळे मूळ लेखक, पुस्तकांचे महत्त्व वाढले असल्याचेही दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी स्पष्ट केले. मालिका निर्मितीत लेखक मोलाची भूमिका बजावतो. त्याने कथा लिहिल्याशिवाय दृकश्राव्य माध्यमासाठी आशयनिर्मिती करता येणार नाही. वेब सीरिज निर्मितीमुळे लेखकांचे महत्त्व अधोरेखित होते. पुन्हा एकदा प्रेक्षक ते पुस्तक वाचतात. सध्या अनेक लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये लेखकांना निर्मात्यांशी थेट बोलण्याची संधी मिळते. त्यांना कथा आवडल्यास पुढे आशयनिर्मिती करणे सोपे होते, असेही त्यांनी सांगितले.