भाकरी का करपली, घोडा का अडला या प्रश्नांचे उत्तर ‘फिरवले नाही’ म्हणून असे आहे. दूरदर्शनपासून प्रेक्षक दूर का गेले? या प्रश्नाचे उत्तरही थोडेसे तसेच आहे. भारतात मनोरंजनाच्या क्षेत्रात मक्तेदारी असलेल्या दूरदर्शनला आणि पुढे मुंबई दूरदर्शन केंद्राला अर्थात सह्य़ाद्री वाहिनीला खासगी मराठी मनोरंजन आणि वृत्तवाहिन्यांची तगडी स्पर्धा निर्माण झाली आणि दूरदर्शन- सह्य़ाद्री वाहिनीपासून प्रेक्षक हळूहळू दूर जाऊ  लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टीआरपी’च्या भाषेत किंवा कागदावरही दूरदर्शनला-सह्य़ाद्री वाहिनीला प्रेक्षकसंख्या जास्त असली तरीही दूरदर्शनचे कार्यक्रम, दैनंदिन मालिकांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविली आहे. दूरदर्शनचा हा सर्व प्रेक्षक खासगी मनोरंजन वाहिन्यांवरील मराठी, हिंदी दैनंदिन मालिकांनी तसेच वृत्तवाहिन्यांनी काबीज केला, ही वस्तुस्थिती दुर्लक्षून चालणार नाही. मनोरंजन, प्रबोधन हा दूरदर्शनचा वसा आहे. विशिष्ट चौकटीतच राहून कार्यक्रम सादर करावे लागतात हे जरी वास्तव असले तरीही काळानुरूप  बदल न केल्यामुळे आणि सरकारी मानसिकतेतून, सरकारी नियंत्रणाच्या जोखडातून बाहेर न पडल्याने दूरदर्शन-सह्य़ाद्री वाहिनीपासून प्रेक्षक दूर जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिन्यांचा विचार न करता फक्त प्रादेशिक त्यातही मुंबई दूरदर्शनचा अर्थात ‘सह्य़ाद्री’ वाहिनीचे जरी उदाहरण घेतले तरीही प्रेक्षक दूरदर्शनपासून कसा दूर गेला आहे हे सहज लक्षात येईल. शहरी भागापेक्षा दूरदर्शन/सह्य़ाद्री वाहिनी आजही ग्रामीण भागात पाहिली जाते, असे दूरदर्शनचे म्हणणे असते. त्यात तथ्य असेलही. पण सर्वसामान्य प्रेक्षकांपैकी कोणालाही ‘सह्य़ाद्री’ वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या किंवा होऊन गेलेल्या काही मालिकांची नावे सांग, असा प्रश्न विचारला तर अपवाद वगळता फारशी नावे सांगताच येणार नाहीत. तेच खासगी मराठी मनोरंजन वाहिन्यांवरील खंडीभर मालिकांची नावे मात्र पटापट सांगता येतील. असे का झाले, याचा दूरदर्शन- सह्य़ाद्री वाहिनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कधीतरी गंभीरपणे विचार केला आहे का?

मुंबई दूरदर्शन केंद्र १९७२ मध्ये सुरू झाले. म्हणजे आता हे केंद्रही ४५ वर्षांचे झाले असून या केंद्राचीही पन्नाशीकडे वाटचाल सुरू झाली आहे. एकेकाळी वैभवाच्या शिखरावर असलेल्या दूरदर्शला/ मुंबई दूरदर्शनला उतरती कळा का लागली याचाही विचार होणे गरजेचे आहे. सरकारी नोकरी, त्यामुळे निवृत्त होईपर्यंत नोकरीची हमी या भावनेतून काही अपवाद वगळता दूरदर्शनवर काम करणारी मंडळी नुसत्या पाटय़ा टाकण्याचे काम करतात असा आरोप केला जातो. कोणी काही नव्याने प्रयोग करायचे म्हटले तर त्याचे पाय ओढले जातात किंवा आर्थिक निधीचे कारण पुढे केले जात, असेही सांगितले जाते.

याचे साधे उदाहरण म्हणजे दूरदर्शनच्या सह्य़ाद्री वाहिनीच्या बातम्या. दूरदर्शनच्या बातम्या विश्वासार्ह असतात, त्या बातम्यांना सर्वाधिक प्रेक्षकवर्ग आहे हे जरी खरे असले तरी त्यावर आणि टीआरपीच्या आकडय़ांच्या खेळावर जोरावर तुम्ही प्रेक्षकांना आपलेसे करू शकत नाही, हीसुद्धा वस्तुस्थिती आहे. अन्य खासगी वाहिन्यांप्रमाणे सनसनाटी किंवा ब्रेकिंग न्यूज तुम्ही देऊही नका. पण ज्या बातम्या द्याल त्यात ‘लाईव्हनेस’तरी आणाल की नाही? सरकारी कार्यक्रम, या मंत्र्याने किंवा त्या मंत्र्याने केलेले उद्घाटन, मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम सोडले तर ज्यात खरी ‘बातमी’ आहे, अशा लोकांशी संबंधित किती बातम्या सह्य़ाद्रीवरून दाखविल्या जातात? समाजात दररोज घडणाऱ्या किती घटनांचे प्रतिबिंब या बातम्यांमधून उमटते? आजही बरेचदा काही बातम्यांचा अपवाद वगळता ‘मुक्या बातम्या’ पाहायला मिळतात. म्हणजे मागे नुसती दृश्ये दिसतात आणि बातम्या वाचणाऱ्याची ‘बडबड’ ऐकावी लागते. दूरचित्रवाणी/दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे ना? दूरदर्शनकडे अद्ययावत स्टुडिओ, साधनसामग्री आहे ना?  मग त्याचा फायदा या बातम्यांमध्ये का करून घेतला जात नाही? अजूनही जुन्या पठडीप्रमाणेच बातम्या का सादर केल्या जातात? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत.

खरे तर खासगी मराठी मनोरंजन वाहिन्यांची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्यांच्या कार्यक्रमांची शैली ही दूरदर्शनवरील कार्यक्रमांप्रमाणेच होती. मुंबई दूरदर्शन केंद्रांवरील कार्यक्रमांना आदर्श मानून त्याप्रमाणेच या खासगी वाहिन्यांनी त्यांच्या सर्व कार्यक्रमांची आखणी/मांडणी केली होती. पण काही वर्षांतच खासगी मनोरंजन वाहिन्या, वृत्तवाहिन्यांवरील  कार्यक्रम, मालिका, बातम्या लोकप्रिय झाल्या आणि दूरदर्शन अर्थात सह्य़ाद्री वाहिनी मागे पडत गेली. एके काळी मुंबई दूरदर्शन केंद्रावरील ‘प्रतिभा आणि प्रतिमा’,  ‘गजरा’, ‘शब्दांच्या पलीकडले’, ‘सुंदर माझे घर’ आणि आणखीही अनेक दर्जेदार कार्यक्रमांनी लोकांच्या मनात घर केले होते. आजही ते कार्यक्रम, त्याचे निर्माते, सादरकर्ते, त्यातील कलाकार प्रेक्षकांच्या लक्षात आहेत, हेच त्याचे खरे यश आहे. ‘रामायण’, ‘महाभारत’ यासारख्या मालिकांच्या प्रसारणवेळेत देशभरातील अवघे रस्ते ओस पडायचे. ‘बुनियाद’, ‘हमलोग’ या हिंदी तर ‘श्वेतांबरा’, ‘महाश्वेता’, ‘दामिनी’ आदी मराठी मालिकांनी आज खासगी मनोरंजन वाहिन्यांवर फोफावलेल्या दैनंदिन मालिकांचा पाया घातला असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. पण दूरदर्शनला आपले हे वैभव टिकविता आले नाही. प्रेक्षक दूरदर्शनपासून, ‘सह्य़ाद्री’ वाहिनीपासून दुरावत गेला.

दूरदर्शनवरील राजकारणामुळे अनेक चांगली माणसे दूरदर्शन-सह्य़ाद्री वाहिनी सोडून खासगी वाहिन्यांकडे वळली. आपल्या अनुभवाचा त्यांनी या वाहिन्यांना फायदा करून दिला. तर काहींनी राजकारणाला कंटाळून दूरदर्शनची नोकरी सोडली. खासगी मनोरंजन वाहिन्यांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काही बदल दूरदर्शन/सह्य़ाद्री वाहिनीत जरूर करण्यात आले. पण यातही आपणच ‘चमकेश’ कसे होऊ  त्याकडे जास्त लक्ष दिले गेले. दूरदर्शनला मोठे करण्यापेक्षा ते स्वत: मोठे झाले, मिरवायला लागले. पण यामुळे खासगी मराठी मनोरंजन वाहिन्यांना दूरदर्शनने-सह्य़ाद्री वाहिनीने टक्कर दिली का, आपले तगडे आव्हान पुन्हा त्यांच्यासमोर उभे केले का? तर याचे उत्तर नाही असेच आहे. या तात्पुरत्या व वरवरच्या मलमपट्टीने विशेष फरक पडलेला नाही.

या सगळ्या गर्तेतून बाहेर पडून दूरदर्शनला-सह्य़ाद्री वाहिनीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर सगळ्यात पहिल्यांदा दूरदर्शनला सरकारी जोखडातून बाहेर काढून स्वायत्तता देण्याची गरज आहे. प्रबोधनाबरोबरच निखळ मनोरंजन करणे आणि खासगी मराठी मनोरंजन वाहिन्यांना टक्कर देण्यासाठी एकूणच संपूर्ण रचनेत वरपासून ते खालपर्यंत आमूलाग्र फेरबदल झाले पाहिजेत. कार्यक्रम व मालिकांची आखणी, मांडणी, सादरीकरणासह तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेतही मूळापासून बदल झाला पाहिजे.

दूरदर्शनच्या तुलनेत आकाशवाणीने काळानुरूप आपल्यात बदल केला आणि एफ.एम वाहिन्यांच्या रूपाने तो दिसतोही आहे. म्हणजे ठरविले तर दूरदर्शनलाही बदलता येईल. पण त्यासाठी प्रखर इच्छाशक्तीची खरी गरज आहे. खासगी मनोरंजन वाहिन्या, वृत्तवाहिन्यांच्या तुलनेत दूरदर्शनचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे, आम्हीच विश्वसार्ह आहोत, आम्ही फक्त मनोरंजन नाही तर प्रबोधनही करतो, या कोशातून बाहेर पडण्याची आज खरी गरज आहे. ते जर लवकरात लवकर झाले नाही तर केवळ कागदावर आणि आकडय़ांच्या खेळात दूरदर्शन-सह्य़ाद्री वाहिनी खासगी मनोरंजन व वृत्तवाहिन्यांच्या तुलनेत पुढे असेल किंवा राहीलही. पण प्रेक्षक दूरदर्शनपासून आणखी दूर गेलेले असतील हे नक्की..

  • भारतात १५ सप्टेंबर १९५९ मध्ये दूरदर्शनची मुहूर्तमेढ रोवली गेली. मराठी माणसासाठी अभिमानास्पद बाब म्हणजे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व अर्थात पु. ल. देशपांडे हे दूरदर्शनचे पहिले संचालक होते. त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे १९७२ मध्ये मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाले. दर्जेदार कार्यक्रमांनी मनोरंजनाच्या क्षेत्रात स्वत:ची मक्तेदारी निर्माण केलेल्या दूरदर्शन/ सह्य़ाद्री वाहिनीपासून प्रेक्षक आज ‘दूर’ झाले आहेत..
  • दूरदर्शनची सुरुवात झाली तेव्हा दूरदर्शनचे प्रसारण आठवडय़ातून फक्त तीन दिवस आणि तेही फक्त अर्धा तास इतका वेळ असायचे.
  • १९७२ मध्ये मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाले.
  • १९६५ मध्ये दूरदर्शनचे दैनंदिन प्रसारण सुरू झाले. पाच मिनिटांचे बातमीपत्र याच वर्षी सुरू करण्यात आले.
  • १९७५ पर्यंत दूरदर्शन भारतातील अवघ्या सात शहरांपुरतेच मर्यादित होते.
  • १९८२ मध्ये दूरदर्शनचे रंगीत प्रसारण सुरू झाले.
  • आज दूरदर्शनच्या दोन राष्ट्रीय वाहिन्या, ११ प्रादेशिक वाहिन्यांसह एकूण २१ वाहिन्या आहेत.
  • ४६ स्टुडिओ आणि १४ हजार ट्रान्समीटर दूरदर्शनकडे आहेत.
  • ‘हमलोग’,‘बुनियाद’, ‘रामायण’, ‘महाभारत’ यासारख्या मालिकांनी दूरदर्शनच्या लोकप्रियतेवर कळस चढला.
  • दूरदर्शनवरील जाहिरातीही एके काळी लोकप्रिय व तोंडपाठ होत्या. वॉशिंग पावडर निरमा, रसना, बुलंद भारत की बुलंद तसबीर हमारा बजाज, लिरील ही याची काही प्रातिनिधिक उदाहरणे.
  • ३ नोव्हेंबर २००३ मध्ये दूरदर्शनची २४ तास चालणारी वृत्तवाहिनी सुरू झाली.
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Articles in marathi on doordarshan
First published on: 17-09-2017 at 02:53 IST