मानसी जोशी, लोकसत्ता
टाळेबंदीमुळे तीन महिने मालिकांचे चित्रीकरण बंद असल्याने मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार-तंत्रज्ञांचे रोजगार बुडाले. जुलैपासून मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले असले तरीही राज्य सरकारने ६५ वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ कलाकार आणि तंत्रज्ञांना सेटवर येण्यास घातलेल्या निर्बंधांमुळे अनेक कलाकारांना घरीच बसून राहण्याची पाळी आली होती. तीन महिने काम थांबल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कलाकारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आरोग्यहिताच्या दृष्टीने घेतलेल्या राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या संघटनांनी आणि ज्येष्ठ कलाकारांनी आवाज उठवला. ज्येष्ठ अभिनेते-लेखक प्रमोद पांडे आणि इम्पा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. इतर क्षेत्रांत ज्येष्ठ नागरिकांना काम करण्याची अनुमती असताना कलाकारांवरच या प्रकारचा निर्बंध का, असा मूलभूत प्रश्न उपस्थित करत याविरुद्ध संपूर्ण मनोरंजनसृष्टी एकवटली. अखेर ७ ऑगस्टला राज्य सरकारचा हा निर्णय अयोग्य ठरवत मुंबई उच्च न्यायालयाने ज्येष्ठ कलाकार आणि तंत्रज्ञांना काम करण्यास हिरवा कंदील दिला आहे. मात्र या निर्णयानंतर निर्मात्यांवरची जबाबदारी वाढेल का? ज्येष्ठ कलाकारांना त्यांच्या घरातूनही पाठिंबा मिळेल का? त्यांच्यासाठी सेटवर आणखी काही उपाययोजना के ल्या जातील का? याबद्दल निर्माते आणि खुद्द कलाकारांशी बोलून वेध घेण्याचा हा प्रयत्न..
रोजगाराचा मार्ग खुला
एका हिंदी मालिके साठी माझी निवड झाली, मात्र माझे वय ६५ पेक्षा अधिक असल्याने मालिकेच्या टीमने मला नकार दिला. ज्येष्ठ कलाकारांना चित्रीकरणात सहभागी न करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे मला हे काम मिळाले नाही. या प्रकरणी कायद्याचा सखोल अभ्यास करून मी न्यायालयात याचिका दाखल करण्याचे ठरवले. याप्रकरणी इम्पाचे सहकार्य मिळाले. न्यायालयात याचिका दाखल केल्यावर तीन आठवडय़ांत याचा निकाल लागला हे लक्षणीय आहे. मार्चपासून अनेक लोकांचे काम थांबले आहे. मालिकेत दुय्यम भूमिका करणारे कलाकार, स्पॉट दादा, वेशभूषा, केशभूषा, अॅक्शन दृश्ये करणारे, लाइटमन यांना दरदिवशी चार ते पाच हजार रुपये मिळतात. करोनामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नावरही गदा आली आहे. हिंदी तसेच मराठी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांच्या घरून दृश्यांचे चित्रीकरण केले जात आहे. मात्र, दुय्यम भूमिका करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांच्या बाबतीतही घरून चित्रीकरण करून घेतले जाणार नाही. या एका निर्णयामुळे अशा हजारो कलाकार-तंत्रज्ञांवर घरी बसून राहण्याची वेळ आली होती, त्यांच्या रोजगाराचा मार्ग उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे खुला झाला, याबद्दल समाधान वाटते.
– प्रमोद पांडे, लेखक-अभिनेते
*****
सुरक्षेचे पालन करून चित्रीकरण
ज्येष्ठ कलाकारांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करूनच हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्पष्ट केले होते. ६५ अथवा त्याहून जास्त वयाच्या कलाकार आणि तंत्रज्ञांना करोना संसर्गाचा धोका जास्त असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयामुळे यावर उपजीविके साठी अवलंबून असलेले ज्येष्ठ कलाकार आर्थिक विवंचनेत सापडले होते. न्यायालयाच्या निर्णयामुळे या कलाकारांचा सेटवरचा सहभाग शक्य झाला असला तरी आता त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊनच चित्रीकरण के ले जाईल. ज्येष्ठ कलाकार सेटवर आल्यावर त्यांचे निर्जंतुकीकरण तसेच सुरक्षेच्या सर्व उपाययोजना पाळून चित्रीकरण करण्यात येईल. सेटवर येण्यापूर्वी ज्येष्ठ कलाकारांकडून त्यांच्या आजाराची माहिती, शारीरिक आणि मानसिक स्थिती, प्रवासाचा इतिहास या गोष्टी तपासल्या जातील.
–नितीन वैद्य, निर्माते
*****
चित्रीकरणासाठी कुटुंबीयांची मदत
गेले कित्येक दिवस मी घरातूनच चित्रीकरण करतो आहे. त्यामुळे ‘माझा होशील ना’ या मालिके तील माझ्या कु टुंबापासून मी सध्या दूर आहे. घरून चित्रीकरण करत असलो तरी सेटवर काम करण्याचा अनुभव वेगळा असतो. घरातूनच चित्रीकरण करत असल्याने प्रकाशयोजना, जागा, केशभूषा आणि वेशभूषा यासाठी कुटुंबीयांची मदत होते आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे आता सेटवर जाणे शक्य होणार आहे, पण कु टुंबीय मला चित्रीकरणासाठी सेटवर पाठवतील की नाही याबद्दल अजून साशंक आहे. सध्या तरी घरातूनच चित्रीकरण करणार आहे, मात्र या निर्णयाचे मी स्वागत करतो. यामुळे कित्येक ज्येष्ठ कलाकारांच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
–अच्युत पोतदार, अभिनेते
*****
विमा संरक्षण मिळावे
निर्णयाबाबत आनंद तर झाला आहेच. न्यायालयाच्या या निर्णयामुळे हातावर पोट असलेल्या कलाकार-तंत्रज्ञांना मोठा दिलासा मिळेल. राज्य सरकारने मनोरंजन सोडून इतर कोणत्याच क्षेत्रात ६५ वर्षे अथवा त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना काम करण्यास निर्बंध घातले नव्हते. टाळेबंदीतही डॉक्टर, दुकानदार यांचेही काम सुरूच होते. माझ्यासोबत इतर कलाकारांनीही याबाबत आवाज उठवला होता. सर्वाच्या एकत्रित प्रयत्नांचे हे यश आहे. याचबरोबर ज्येष्ठ कलाकारांच्या विमा संरक्षणाच्या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विमा संरक्षण हा प्रत्येक माणसाचा मूलभूत हक्क असून निर्मात्यांनी ज्येष्ठ कलाकार आणि तंत्रज्ञांना विमा संरक्षण द्यावे. आरोग्याच्या कारणास्तव ६० वर्षे व त्याहून अधिक नागरिकांचा विमा काढण्यास विमा कंपन्या तयार होत नाहीत. निर्माते आणि वाहिन्या यांनी एकत्र येत या समस्येवर तोडगा काढावा.
– प्रदीप वेलणकर, अभिनेते
*****
अयोग्य कायदा
राज्य सरकारचा हा कायदा अयोग्यच होता. संविधानाने आम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची, पैसे कमवण्याची मुभा दिली आहे. टाळेबंदीमुळे तीन महिने चित्रीकरण थांबल्याने अनेक लोकांचे रोजगार बुडाले असल्याने दैनंदिन गरजा भागवण्यासही त्यांच्याकडे पैसे नाहीत. परिणामी अनेक कलाकारांनी आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आले आहेत. तरुण मुले काही तरी काम करून पैसे कमावतील, मात्र ज्येष्ठ नागरिकांना या वयात कोण दुसरे काम देणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. केंद्राकडून आलेल्या या मार्गदर्शक सूचनेचे राज्याने कायद्यात रूपांतर केल्याचे समजल्यावर मी त्याविरोधात व्यक्त झालो होतो. यामुळे उच्च न्यायालयाची पायरी चढावी लागली. घर तसेच दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ज्येष्ठ कलाकारांना बाहेर काम करावेच लागेल. याबाबत माझ्या कुटुंबीयांचा मला संपूर्ण पाठिंबा आहे.
–विक्रम गोखले, अभिनेते
*****
सेटवर जाण्यास उत्सुक
या निर्णयामुळे माझ्यासारख्या अनेक ज्येष्ठ कलाकारांना चित्रीकरणात सहभागी होता येईल. पुन्हा ‘डॉक्टर डॉन’च्या सेटवर जाण्यासाठी मी उत्सुक आहे. घरी असल्याने सेटवरील लोकांची गडबड-गोंधळ, कलाकारांशी गप्पा या गोष्टींची प्रकर्षांने आठवण येते. मात्र सध्या राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार चित्रीकरण करणे आव्हानात्मक ठरणार आहे. जुलैपासून चित्रीकरण सुरू झाल्यावर मी घरातून काही दृश्ये चित्रित केली. यापूर्वी सेटवर मदतीस केशभूषाकार असल्याने काम सोपे होते. येथे मात्र केशभूषा, वेशभूषा आणि रंगभूषा सगळे स्वत:च करायचे असल्याने घरी चित्रीकरणाचा अनुभव माझ्यासाठी वेगळा ठरला आहे. मालिकेत मी केसांचे विग घालते. सुरुवातीला केसांचे विग लावण्यास थोडीशी अडचण आली. नंतर मात्र हे अंगवळणी पडले आहे. घरी प्रकाशयोजना, त्यास अनुरूप जागा पाहून चित्रीकरण करावे लागते. यामुळे मला कॅमेरा, दृश्यसंगती, फ्रेम्स याविषयी नव्याने शिकायला मिळाले. हा अनुभव गाठीशी बांधला असला तरी सध्या मात्र सेटवर जाण्यासाठी खूप उत्सुक आहे.
– रोहिणी हट्टंगडी, अभिनेत्री
*****
सिन्टाकडून स्वागत
न्यायालयाच्या निर्णयामुळे ज्येष्ठ कलाकारांना दिलासा मिळाला असून त्यांच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. टाळेबंदीमुळे तीन महिने मालिकांचे चित्रीकरण ठप्प असल्याने अनेक ज्येष्ठ कलाकार आणि तंत्रज्ञांच्या आर्थिक उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला होता. अभिनेते प्रमोद पांडे यांनी दाखल के लेल्या याचिके मुळे तसेच मनोरंजनविश्वातील संघटनांनी राज्य सरकारकडे के लेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया सिन्टाचे अध्यक्ष अमित बहल यांनी व्यक्त के ली.
