बिग बॉस फेम शहनाझ गिल मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर काही ना काही कारणानं चर्चेत आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाझने सोशल मीडियापासून दूर होती. पण नुकतेच शहनाझचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये शहनाझ तिच्या मैत्रीणीच्या साखरपुड्याच्या पार्टीमध्ये डान्स करताना दिसत आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर बरेच दिवस दुःखात असलेल्या शहनाझला आनंदी पाहिल्यानंतर चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला. पण त्यावर आसिम रियाजनं कमेंट केल्यानंतर मात्र शहनाझचे चाहते भडकलेले पाहायला मिळाले.
आसिम रियाजनं शहनाझचं नाव न घेता एक ट्वीट केलं होतं. ज्यामुळे शहनाझचे चाहते त्याच्यावर भडकलेले पाहायला मिळाले. आसिमनं त्याच्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘आत्ताच काही डान्स व्हिडीओ क्लिप पाहिल्या. खरंच लोक आपल्या माणसांना किती लवकर विसरून जातात. व्वा… व्वा…’ आसिमच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर शहनाझ आणि सिद्धार्थचे चाहत्यांनी त्याला चांगलंच सुनावलं.
आसिमच्या या ट्वीटला रिट्वीट करत अनेक युजर्सनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी आसिमला बरंच सुनावलं आहे. अनेकांनी त्याला, ‘जर तुला एखाद्या पार्टीला बोलवलं तर तू काय तिथे रडत बसणार आहेस का? तुझ्या मते तिने दिवसभर रडत बसावं का? कधीही कोणत्याही पार्टीमध्ये तिने फक्त रडत राहावं असं तुला वाटतं का? असं निर्लज्ज माणसासारखं ट्वीट करणं बंद कर’ अशा शब्दात सुनावलं आहे.
काही युजर्स ‘बिग बॉस’मधील त्यांच्या भांडणाबाबतही बोलले आहेत. एका युजरनं लिहिलं, ‘हा तर त्या पारसपेक्षांही वाईट आहे. तिच्या वाईट काळात तिला टार्गेट करत आहे. पहिल्यांदाच मी कोणाबाबत वाईट विचार करत आहे.’
शहनाझने काही दिवसांपूर्वीच तिच्या एका मैत्रीणीच्या साखरपुड्याच्या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीतील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडीओमध्ये शहनाझ ‘झिंगाट’ गाण्यावर डान्स करताना दिसली होती. या पार्टीमध्ये अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी, मोनालिसा, विक्रांत सिंह आणि कॉमेडियन परितोष त्रिपाठी यांनीही हजेरी लावली होती.