‘ब्रह्मास्त्र पार्ट १ : शिवा’ या चित्रपटाने ३०० कोटींपेक्षा जास्त रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी बायकॉट बॉलिवूडचे वारे वाहत होते. या ट्रेंडमुळे चित्रपट फ्लॉप होईल अशी भीती निर्मात्यांना होती. पण या चित्रपटाने बॉलिवूडविरोधात सुरु असलेला हा ट्रेंड थांबवला. रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. ब्रह्मास्त्रच्या घोषणेपासूनच हा चित्रपट नेटीझन्ससाठी चर्चेचा विषय बनला होता.
अयान मुखर्जीने २०१७ मध्ये या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यानंतर २०२२ च्या एप्रिल महिन्यात ‘केसरिया’ या गाण्याचा काही सेकंदांचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. या गाण्याला खूप लोकप्रियता मिळाली. पुढे जुलैमध्ये संपूर्ण गीत लॉंच केले गेले. केसरिया गाण्यातील ‘लव्ह स्टोरीया’ या शब्दामुळे लोकांनी या दिग्दर्शक, गीतकार आणि इतर कलाकारांना ट्रोल करायला सुरुवात केली. याच काळात चित्रपटाची वाढलेली क्रेझ पाहायला मिळाली. चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलरमधल्या बारीकसारीक गोष्टींवरुन लोक मीम्स बनवायला लागले.
ब्रह्मास्त्र प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच त्यावरचे मीम्स, रील्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागले. आलियाने साकारलेली ईशा संपूर्ण चित्रपटात सतत शिवा.. शिवा.. करत असते. या मजेशीर मुद्दा वापरुन चांदनी या मिमिक्री आर्टिस्टने तयार केलेले रील व्हायरल झाले आहे. एनडीटीव्हीच्या एका मुलाखतीमध्ये आलियाने चांदनीची स्तुती केली आहे. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या अयान मुखर्जीने यामागील कारण स्पष्ट केले. तो म्हणाला, “यावर फार मीम्स बनत आहेत. मला बोलताना समोरच्या व्यक्तीचे नाव सतत घ्यायची सवय आहे. मी कोणाशीही बोलत असताना त्याचे नाव घेऊनच वाक्य बोलतो. मला वाटते हीच सवय या पात्रांना लागली असावी”
अयान मुखर्जींच्या या चित्रपटाच्या लेखन विभागाने प्रेक्षकांना फार निराश केले आहे. यावरुन तो व अन्य निर्माते ट्रोल होत आहेत.