रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल ११ नोव्हेंबर लागला. अनेक दशकांपासून रखडलेल्या या वादावर तोडगा काढत न्यायालयाने केंद्र सरकारला कार्यवाही करण्याचे आदेश दिले. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यात यावे, तर मशिदीसाठी मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्यात येईल, असा निर्णय घटनापीठाने दिला. आता या खटल्यावर बॉलिवूडमधील दिग्गज कलाकरांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

संगीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनीदेखील त्यांचे मत मांडले आहे. नुकसानभरपाई म्हणून मिळणाऱ्या अयोध्येतील जागेवर चॅरिटेबलच्या माध्यमातून रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला तर खुप चांगले होईल. या जागेवर उभारण्यात आलेले रुग्णालय सर्व समाजातील लोकांच्या मदतीने आणि सहभागाने चालवण्यात यावे, असे जावेद अख्तर यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापिठाकडून हा निकाल देण्यात आला. अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्लाची असल्याचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. या निकालाकडे संपूर्ण देशांचे लक्ष लागले होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी याआधीच सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. रामजन्मभूमी मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा तसेच मुस्लीम वक्फ बोर्डाला मशिदीच्या उभारणासाठी पाच एकरांची पर्यायी जागा देण्याचा निकाल न्यायालयाने दिला.