‘तेरी मिट्टी’, ‘फिलहाल’, ‘मन भरिया’ यांसारखी अनेक उत्तम गाणी तयार करणारा गायक बी प्राक सर्वांनाच माहीत आहे. त्याने फार कमी वेळात पंजाबी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळेपण निर्माण केले आहे. ‘केसरी’ चित्रपटातील त्याचे ‘तेरी मिट्टी’ हे गाणे आजही चाहत्यांना आवडते. बी प्राकची गाणी त्याच्या चाहत्यांना मनापासून आवडतात. त्यामुळेच तो इतक्या कमी काळात यशस्वी होऊ शकला.

वडिलांना बी प्राकनं गायक व्हावं असं वाटत नव्हतं

बी प्राकचा आवाज चाहत्यांना खूप आवडतो. पण, त्याचे वडील व प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक वरिंदर यांना बी प्राकने गायनात करिअर करावे, असे वाटत नव्हते. अलीकडेच ‘लल्लनटॉप’शी झालेल्या संभाषणात, बी प्राकने त्याच्या वडिलांचा उल्लेख करताना ही माहिती उघड केली. त्याने सांगितले की, एक मोठा पंजाबी संगीत दिग्दर्शक असूनही, त्याचे वडील बी प्राकला गायक म्हणून लाँच करू इच्छित नव्हते. त्याच्या बालपणीची कहाणी सांगताना गायक म्हणाला, “जेव्हा मी लहानपणी माझ्या आईबरोबर बसायचो, तेव्हा मी काही ना काही संगीत बनवायचो.”

“मी माझ्या आईला सांगायचो की, मी संगीत दिग्दर्शक नाही; तर गायक होईन. पण मला माहीत नव्हतं की, मी कधी संगीत दिग्दर्शक होईन. पण माझे वडील म्हणायचे की, मी तुला गायक बनवू शकत नाही. संगीत शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर ते मला गाण्याची परवानगीही देत ​​नव्हते. ते म्हणायचे की, तू चांगले गात नाहीस. ते मला म्हणाले की, माझ्याकडे तुला गायक म्हणून लाँच करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. त्यांनी मला संगीत दिग्दर्शक होण्यास सांगितले.”

बी प्राकला संगीत दिग्दर्शक नव्हे, तर गायक व्हायचे होते

बी प्राक पुढे म्हणाला की, त्याच्या वडिलांनी त्याला संगीत शिकण्यासाठी अनेक स्टुडिओंमध्ये पाठवले. त्यांनी तेथील लोकांना सल्ला दिला की, बी प्राकशी कोणत्याही विशेष पद्धतीने वागू नये; जेणेकरून बी प्राक संगीत योग्यरीत्या समजून घेऊ शकेल आणि भविष्यात स्वतःचे नाव कमवू शकेल. बी प्राक म्हणाला, “माझे वडील खूप प्रसिद्ध होते; पण तरीही लोकांनी मला संगीत शिकवले नाही. मग त्यांनी मला सांगितलं की, आजपासून तू माझ्या नावानं कुठेही काम मागू नको. तुला स्वतःचं नाव कमवावं लागेल.”

“ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट होती. माझे वडील इतके मोठे आहेत याचे मला थोडे वाईट वाटले. त्यांनी मला हे इतक्या सहजपणे कसे सांगितले? पण, त्यांचा निर्णय माझ्यासाठी अगदी योग्य ठरला. शेवटी मी सरस्वती स्टुडिओमध्ये जाऊ लागलो, जिथे मी संगीत शिकलो. माझ्या वडिलांनी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, तुम्हाला हे विसरून जावे लागेल की, तो वरिंदरचा मुलगा आहे. तुम्हाला त्याला ज्या पद्धतीने शिकवायचे आहे ते शिकवा. जे काही माझ्याबरोबर घडले, त्याने मला आज खूप काही दिले आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बी प्राक यांचे वडील वरिंदर बच्चन हे पंजाबी संगीत उद्योगातील एक प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक होते, ज्यांनी अनेक पंजाबी गाणी आणि हिंदू भजने कंपोज केले. त्यांनी योगराज सिंग यांच्या ‘जट पंजाब दा’ या पंजाबी चित्रपटातही काम केले होते. काही काळापूर्वी २०२१ मध्ये त्यांचे निधन झाले.