भारतीय चित्रपटसृष्टीत अजूनही ‘बाहुबली २ द कन्क्लुजन’ चित्रपटाचीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने कोणाला भुरळ पाडली नसेल अशी व्यक्ती दुर्मिळच असेल. या चित्रपटाला मिळालेली पोचपावती म्हणजेच त्याने केलेली कमाई. एसएस राजामौली दिग्दर्शित आणि प्रभास, राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने १७०० कोटींच्या वर कमाई केली आहे.

वाचा : .. या मराठी अभिनेत्री साजरी करणार त्यांची पहिली वटपौर्णिमा

‘बाहुबली द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटांना समीक्षक आणि प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच, अनेक दिग्दर्शक, निर्मात्यांनीही भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मैलाचा दगड ठरलेल्या ‘बाहुबली २’ चित्रपटाची प्रशंसा केली. पण, एका दिग्दर्शकाला हा चित्रपट काही आवडलेला नाही. मनोरमा न्यूजच्या बैठकीत अदूर गोपालकृष्णन यांनी बाहुबलीसारख्या मोठ्या चित्रपटांवर आपले मत व्यक्त केले. या बैठकीला गीथू मोहनदास आणि फाहद फासिल हेसुद्धा उपस्थित होते. अदूर म्हणाले की, बाहुबली हा पाताळ भैरवी या तेलगू फॅण्टसी चित्रपटासारखारच आहे. ‘पाताळ भैरवी’ १९९१ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचप्रमाणे,’ ‘बाहुबली २’ने भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतेही मोलाचे योगदान दिलेले नाही. हा चित्रपट बघण्यासाठी मी १० रुपयेसुद्धा खर्च करणार नाही,’ असेही त्यांनी म्हटले. अदूर गोपालकृष्णन हे राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आहेत.

वाचा : अजूनही सुनीलच्या परतण्याची कपिलला आस

‘बाहुबली २’ सध्या बॉक्स ऑफिसवर विक्रमांचे डोंगर रचत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना उलटूनही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरु आहे. दरम्यान, प्रभास आणि राणा डग्गुबती या दोघांनीही चित्रटातील व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी ३० किलो वजन वाढवलं होते. त्यावेळी या दोघांचे वजन १०० किलोंपर्यंत गेलं होतं. आपली देहयष्टी चित्रपटातल्या व्यक्तिरेखेशी मिळतीजुळती असावी म्हणून प्रभासचा नाश्ताही वेगळ्या प्रकारचा असायचा.