Sukanya Mone Kulkarni Deepika Padukone Video: सध्या बाईपण भारी देवा सिनेमातील दमदार अभिनयामुळे सुकन्या कुलकर्णी मोने यांचं नाव खूपच चर्चेत आहे. सगळ्यांना आपलीशी वाटणारी साधना सुकन्या यांनी लीलया साकारली होती. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सुकन्या यांच्या जुन्या मालिका, सिनेमांमधील काही निवडक क्लिप्स शेअर करून खरोखरच त्या कशा अष्टपैलू अभिनेत्री आहेत हे दाखवून दिलं होतं. असाच एक व्हिडीओ दीपिका पदुकोणच्या फॅन पेजवरही शेअर करण्यात आला आहे. हा एका जाहिरातीचा व्हिडीओ असून यामध्ये दीपिका पदुकोण व सुकन्या या दोघींचेही कधीही न पाहिलेले लुक दिसत आहेत. हा व्हिडीओ साधारण १३ वर्षांपूर्वी मूळ शेअर करण्यात आला होता मात्र आता बाईपण भारी देवा आणि दीपिकाच्या जवान सिनेमाच्या आधी पुन्हा एकदा नव्याने व्हायरल होत आहे.
तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, ओम शांती ओम सिनेमाच्या आधी जेव्हा दीपिका मॉडेलिंग करत होती तेव्हाचा हा व्हिडीओ असावा. कारण यात तिचा चेहरा आणि अभिनय दोन्हीही एखाद्या नवख्या कलाकारासारखेच दिसत आहेत. दुसरीकडे दीपिका पदुकोणच्या आईची भूमिका केलेल्या सुकन्या कुलकर्णी मोने या सुद्धा वेगळ्याच दिसत आहेत. एका नव्याने लग्न झालेल्या तरुणीच्या आयुष्यात सासर आणि माहेर यामध्ये जाणवणाऱ्या फरकांविषयी हा व्हिडीओ आहे. नैहा मांगल्यम या ब्रॅण्डच्या जाहिरातीसाठी हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता
Video: जेव्हा दीपिका पदुकोण बनली होती सुकन्या मोनेंची लेक
हे ही वाचा << ‘बाईपण भारी देवा’च्या साधनाच्या साडी, ब्लाउज व टिकलीचं ‘हे’ गुपित माहितीये का? सुकन्या मोनेंची अंगठी तर…
हा व्हिडीओ पाहून कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी “या दोन्ही अभिनेत्री त्यांच्या क्षेत्रात आता इतक्या पुढे आल्या आहेत की विश्वासच बसत नाही या त्याच आहेत” अशा पद्धतीच्या कमेंट्सही केल्या आहेत.