Lishalliny Kanaran : मंदिरात आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने एका सौंदर्यवतीची छेडछाड केल्याचा आरोप असलेल्या हिंदू पुजाऱ्याचा मलेशिया पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
मलेशियात जन्मलेली भारतीय वंशाची अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट लिशालिनी कनारन हिने एक धक्कादायक आरोप केला आहे. तिने पुजाऱ्यावर आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण आता मलेशियन पोलिसांपर्यंत पोहोचले आहे आणि आरोपी पुजाऱ्याचा शोध सुरू आहे.
अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक लांब पोस्ट शेअर करून तिच्यावर झालेला अत्याचार शेअर केला आहे. लिशालिनी कनारन हिच्या पोस्टनुसार, गेल्या शनिवारी सेपांग येथील मरिअम्मन मंदिरात ही घटना घडली. सोशल मीडियावर एक लांब पोस्ट लिहून तिने आपला अनुभव शेअर केला, तेव्हा लोकांना याची माहिती मिळाली.
अभिनेत्रीने पोस्टमध्ये व्यक्त केली तिची वेदना
लिशालिनी काही काळापासून आध्यात्मिकतेकडे वळली होती आणि नियमितपणे मंदिरात जात होती. तिची आई भारतात असल्याने ती त्या दिवशी एकटीच गेल्याचे तिने सांगितले. अभिनेत्रीच्या पोस्टनुसार तिने सांगितले की, पुजारी, जो सहसा तिला धार्मिक विधींमध्ये मार्गदर्शन करतो, तो प्रार्थनेदरम्यान तिच्याकडे आला आणि तिला ‘पवित्र पाणी आणि रक्षासूत्र’ देण्याची ऑफर दिली.
पूजेनंतर तेथील पुजाऱ्याने तिला ‘खास आशीर्वाद’ देण्याचे सांगून आपल्या खासगी ऑफिसमध्ये बोलावले. ती म्हणाली की, पूजा संपल्यानंतर पुजाऱ्याने तिला एक तास वाट पाहण्यास सांगितले आणि नंतर तिला त्याच्या वेगळ्या ऑफिसमध्ये नेले. तिने लिहिले, “मी त्याच्या मागे गेले, पण काहीतरी चुकीचं घडतंय असं मला वाटू लागलं. मला आतून अस्वस्थ वाटू लागलं.”
ऑफिसमध्ये गेल्यानंतर पुजाऱ्याने एका तीव्र वासाचे द्रव पाण्यात मिसळून ते ‘पवित्र जल’ असल्याचे सांगितले. पुजाऱ्याने ते पाणी तिच्या चेहऱ्यावर इतके शिंपडले की, तिच्या डोळ्यांची जळजळ होऊ लागली आणि तिला डोळे उघडणेही कठीण झाले होते.
लिशालिनीने सांगितले की, पुढे जे घडले ते अत्यंत त्रासदायक होते. पुजाऱ्याने कोणताही इशारा न देता त्याने त्याचे हात तिच्या ब्लाउज आणि ब्राच्या आत घालून तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, असा धक्कादायक आरोप लिशालिनीने केला आहे. अभिनेत्री म्हणाली की, अशा विश्वासघातामुळे सर्वात जास्त वेदना होतात. मी अधिक तपशिलात जाणार नाही, पण त्या पुजाऱ्याने माझे लैंगिक शोषण केले आणि मी काहीही करू शकले नाही.
मलेशियन पोलिस तपास करत आहेत
मलेशियन पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे आणि आरोपी पुजाऱ्याचा शोध घेतला जात आहे. सोशल मीडियावर या घटनेबद्दल लोक संतापले आहेत आणि अनेक लोक मंदिर प्रशासन आणि अधिकाऱ्यांकडून कठोर कारवाईची मागणी करत आहेत.