कोणताही कलाकार काही वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा अभिनय क्षेत्रात परतला की पहिला प्रश्न असतो, पुनरागमन करतानाची भावना काय? भाग्यश्री पटवर्धन हिला मात्र असा प्रश्नच मान्य नाही. लाईफ ओ.के. या मनोरंजन उपग्रह वाहिनीवरील लौट आओ त्रिशा या कौटुंबिक गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवरील मालिकेद्वारे ती पुन्हा कार्यरत झाली आहे. याबाबत ती सांगत होती, काही काळ मी मोठा अथवा छोटा पडदा यापासून दूर होते याचा अर्थ मी आता पुनरागमन करत आहे असे नव्हे. मी कॅमेऱ्यासमोर नव्हते, पण आपल्या मनोरंजन क्षेत्रातील नवीन घडामोडी, प्रगती याकडे पूर्ण लक्ष होते. त्या माध्यमातूनही चित्रपटसृष्टीशी जवळीक साधता येते असे स्पष्टिकरण देत भाग्यश्री पुढे म्हणाली, या मालिकेत मी आईच्या भूमिकेत असून आपल्या हरवलेल्या मुलीचा शोध घेणे, तिला कधी एकदा भेटतो आहे याबाबत कासाविस असणे अशी ही भावूक भूमिका आहे, समाजातील प्रत्येक स्तरातील आईची आपल्या मुलाबाबत अशीच तगमग असते. त्यामुळे ही भूमिका सकाराताना मला तशी भावना व्यक्त करण्याची संधी मिळत आहे.
भाग्यश्री यावेळी पुढे म्हणाली, मैने प्यार किया या माझ्या पहिल्या चित्रपटाला जवळपास पंचवीस वर्षे झाल्यानंतर त्या चित्रपटामुळे आजही मला ओळख मिळते हेच या माध्यमाचे विशेष आहे. पण कलाकाराला भविष्याकडे लक्ष ठेवून वाटचाल करावी लागते, तेच करीत मी या नवीन मालिकेत विशेष रस घेत आहे… लौट आओ त्रिशा या मालिकेच्या निमित्ताने भेटलेली भाग्यश्री आपल्या या भूमिकेबाबत विशेष उत्साही वाटली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagyashree patwardhan in laut aao trisha
First published on: 30-07-2014 at 04:08 IST