टीव्हीवरचा सर्वात लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’ मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा लोकांना हसवण्यासाठी परत येतोय. या शोमध्ये पुन्हा पहिल्यासारखं काम करता येणार असल्याने या शोमधील कॉमेडियन भारती सिंह सध्या खूपच आनंदात आहे. पण तितकंच तिला एका गोष्टीचं दुःख सुद्दा आहे. करोनाचा जसा परिणाम चित्रपटसृष्टीवर झालाय तितकाच परिणा टीव्ही इंडस्ट्रीवर सुद्धा झालाय. याच कारणामुळे अनेक कलाकारांना हाताला काम नाही आणि ज्यांना काम मिळालंय त्यांना कमी मानधनावर काम करावं लागतंय. असंच काहीसं झालंय कॉमेडियन भारती सिंहच्या बाबतीत…नुकतंच तिने आपला हा दुखवटा व्यक्त केलाय.

एका माध्यमाशी बोलताना भारती सिंहने तिचा हा दुखवटा व्यक्त केला. भारती सिंह सुरवातीला ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये बुआची भूमिका साकारत होती. सध्या ती ‘डान्स दिवाने 3’ हा शो होस्ट करतेय. या शो मध्ये होस्ट करण्यासाठीची तिची फीस ७० टक्के कमी करण्यात आली. तर आता लवकरच सुरू होणाऱ्या तिच्या ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये त्याहूनही कमी म्हणजेच ५० टक्के फीस कमी करण्यात आली.

यावेळी माध्यमासोबत बोलताना भारती सिंह म्हणाली, “या काळात सर्वांनाच दुःख झालं होतं जेव्हा त्यांना पेट कट बद्दल सांगण्यात आलं. माझं सुद्धा काही वेगळं नाही. या विषयावर मी सुद्धा अनेकदा चर्चा केली. पण त्यानंतर मला जाणीव झाली की, गेल्या एक वर्षात कित्येकांचे काम बंद झालेत…टीव्ही शोसाठी स्पॉन्सर्स मिळत नाहीत, अशा परिस्थितीत चॅनल कुठून पैस आणणार? प्रत्येक जण आता स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतोय…एकदा आम्हाला चांगले रेटींग मिळायला सुरूवात झाली की स्पॉन्सर्स सुद्धा आपोआप येतील आणि आमची फीस सुद्धा वाढेल.”

यापुढे बोलताना भारती सिंह म्हणाली, “इतक्या वर्षापासून आम्ही चॅनलमध्ये काम करतो आणि ते आमची प्रत्येक गोष्ट ऐकतात. आज जर ते समोरून आमची मदत मागत आहेत तर मला नाही वाटत कोणत्या कलाकाराने यासाठी नकार दिला असेल…जेव्हा परिस्थिती सामान्य होती, तेव्हा ते आमचं सगळं ऐकत होते…प्रत्येक मागणी पूर्ण करत होते…मला माहितेय सर्वांचे पैसे कट होत आहेत…पण सेटवरील टेक्निशियनचे पैसे कट केले नाही पाहिजेत…काही महिन्यानंतर देशात पुन्हा पहिल्यासारखी परिस्थिती होईल, सारं काही सुरळीत होईल आणि व्हायलाच पाहिजे…”

कमबॅकने आनंदात आहे भारती

टीव्हीवरचा लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा कमबॅक करणार असल्याने भारती सिंह आनंदी आहे. यावर बोलताना भारती म्हणाली, “आम्ही सात वर्षानंतर पुन्हा परततोय…अशा महामारीच्या काळात तर कॉमेडी शो आले पाहिजेत… ”

‘द कपिल शर्मा शो’ याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात ऑफ-एअर करण्यात आला होता. महामारीच्या काळातली शूटिंगची रिस्क आणि कपिश शर्माला ब्रेक हवा असल्याने हा शो बंद करण्यात आला होता. पण आता हा शो पुन्हा एकदा परतणार असल्यानं फॅन्स या शोसाठी आतुरतेने वाटत पाहत आहेत.