भोजपुरी अभिनेते रवी किशन यांनी हिंदी चित्रपटातही त्यांचं योगदान दिलेलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत आणि राजकारणात त्यांचा चांगलाच दबदबा आहे. ११ वीमध्ये असताना रवी किशन यांचं प्रीतीवर प्रेम होतं आणि नंतर तिच्याशीच त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांचं वैवाहिक जीवन उत्तम आहे आणि आज ते एक दोन नव्हे तर चक्क ४ मुलांचे वडील आहेत.
आता ४ मुलं असण्याचा त्यांना पश्चात्ताप होत आहे आणि याचं खापर त्यांनी काँग्रेस सरकारवर फोडलं आहे. ‘जनसंख्या नियंत्रण कायदा’ यावर भाष्य करताना रवी किशन यांनी त्यांचा वैयक्तिक अनुभव शेअर केला आहे. ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रवी किशन यांनी याविषयी खुलासा केला आहे.
आणखी वाचा : ‘धर्म सेन्सॉर बोर्ड’बद्दल जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य; उत्तर प्रदेशमधील फिल्मसिटीबद्दलही मांडलं मत
आपल्या बायकोला होणारा त्रास आणि एकूणच ४ मुलांचा सांभाळ करणं यावर रवी किशन म्हणाले, “माझी ४ मुलं आहेत. एका वाडिलांसाठी त्याच्या मुलांची जडणघडण हा फार मोठा प्रश्न असतो. माझी मुलं जेव्हा मोठी होत होती तेव्हा मी स्ट्रगल करत होतो. याचदरम्यान मला ४ मुलं झाली. आज जेव्हा मला यश मिळालं पण माझ्या पत्नीच्या आरोग्याची प्रचंड हेळसांड झाली आहे. तिच्या शरीरावर होणारा विपरीत परिणाम मी पाहिला आहे. मला याचा पश्चात्ताप होतोय, मी सतत तिची माफी मागतो.”
याचं खापर काँग्रेसच्या माथी फोडत रवी किशन म्हणाले, “हा कायदा काँग्रेस सरकारने आणला असता, तर कदाचित मी थांबलो असतो.” रवी किशन यांना ३ मुलं आणि १ मुलगी आहे. त्यांची मोठी मुलगी रिवाच्या जन्मानंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. तिच्या जन्मानंतरच रवी किशन यांचं नशीब उजळलं आणि त्यांना लोकप्रियता मिळाली. आपली पत्नी आणि मुलगी यांची रवी किशन एखाद्या देवीप्रमाणे पूजा करतात. इतकंच नव्हे तर रात्री झोपताना ते आपल्या पत्नी आणि मुलीच्या पाया पडूनच झोपतात.