फॅण्टसी, महानायकाची पूर्वीची अँग्री यंग मॅनची प्रतिमा, जे आपण करू शकत नाही असे सारे काही करण्याची हिंदी सिनेमाच्या नायकाची किमया आणि याचे सर्वसामान्य प्रेक्षकांना असलेले अप्रूप या गोष्टी गृहीत धरून हमखास यशाचा फॉम्र्युला बनतो. अशाच पद्धतीने ठरीव वळणे घेत दिग्दर्शकाने राजकुमार हिरानी पद्धतीचा ‘भूतनाथ रिटर्न्स’ साकारलाय. चित्रपटाचा पहिला भाग धमाल झाला असला तरी मध्यंतरानंतर प्रचारकी थाटाने जाणारा किंचित लांबलेला हा चित्रपट आहे. निवडणुकीच्या लोकशाही प्रक्रियेवर जाता जाता भाष्य करण्याचा प्रयत्नही दिग्दर्शकाने केला आहे.
चित्रपटाची सुरुवात भूतनाथ वर्ल्डमध्ये होते. सरकारी कामकाज पद्धतीप्रमाणे चाललेल्या या भूतनाथ वर्ल्डमध्ये सगळी मरण पावलेली माणसं म्हणजे आता भूतं वेगवेगळ्या रांगेत उभी आहेत. अमिताभ बच्चन म्हणजेच आपला भूतनाथ हाही भूतनाथ वर्ल्डमध्ये सीईओला भेटून टोकन घेतो. त्याचा टोकन क्रमांक १० कोटी एक हजार २९ वा आहे. माणसाचा जन्म पुन्हा हवा असेल तर एवढय़ा लांब रांगेत उभे राहावेच लागेल असे भूतनाथ वर्ल्डचा सीईओ भूतनाथला सांगतो. मागच्या भूतजन्माच्या वेळी चार लहानग्या पोरांनाही घाबरवू न शकलेल्या भूतनाथला पुन्हा एकदा चिमुरडय़ांना घाबरवण्यासाठी म्हणून पृथ्वीवर पाठविण्यात येते. भूतनाथ थेट धारावीत येतो आणि अक्रोड हा लहान मुलगा त्याला भेटतो. खरेतर घाबरवण्यासाठी आलेला भूतनाथ हा अक्रोडला दिसतो आणि भूतनाथची पुन्हा फसगत होते. सीक्वेल असल्यामुळे मूळ चित्रपटाशी सुसंगतता राखण्याचा हा दिग्दर्शकाचा प्रयत्न चांगला म्हणता येईल. अक्रोड हे नाव आपल्या बालनायकाला देण्याची दिग्दर्शकाची कल्पनाही चांगली आहे. नऊ-दहा वर्षांचा अक्रोड आणि आपला उंच भूतनाथ यांची मैत्री होते. लहान मुलांना घाबरवण्यासाठी आलेला भूतनाथच अक्रोडला घाबरतो. मग धारावीची सफर दिग्दर्शक घडवितो. लोकांचे कसे हाल चालले आहेत, नळाला पाणी येत नाही, सगळीकडे दरुगधी, कचऱ्याचे ढीग असे सारे काही तद्दन फिल्मी पद्धतीने दाखवताना काही गमतीजमती लेखक-दिग्दर्शकांनी केल्या आहेत. त्या जमूनही आल्या आहेत. परंतु, मध्यंतरानंतर चित्रपट निवडणूक, मतदान, गुंडप्रवृत्तीचा भाऊसाहेब हा उमेदवार, त्याच्या क्लृप्त्या, त्यावर भूतनाथ आणि अक्रोडने लढविलेल्या शकली असा काहीशा कंटाळवाण्या पद्धतीने फिरत राहतो. संवाद हेच या चित्रपटाचे बलस्थान ठरते.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ छाप पद्धतीचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे. रंजन करता करता संदेश वगैरे देण्याची इच्छा चांगली असली तरी मध्यांतरानंतर भूतनाथ निवडणुकीला उभा राहतो या संकल्पनेव्यतिरिक्त बाकी सगळ्या गोष्टी अपेक्षित पद्धतीने होत असल्यामुळे चित्रपट प्रचारकी ठरतो. अमिताभ बच्चनच्या पूर्वीच्या अँग्री यंग मॅन प्रतिमेचाही सरधोपट चित्रपट दिग्दर्शनासाठी दिग्दर्शकाने वापर केला आहे. भाऊसाहेब हा चित्रपटाचा एक प्रकारे खलनायक असलेली व्यक्तिरेखा बोमन इराणीने ‘खोसला का घोसला’मधील खलनायकासारखी साकारली आहे. उषा जाधवचा ‘धग’नंतर आलेला हा पहिला हिंदी सिनेमा आहे. छोटय़ाशा भूमिकेला तिने दिग्दर्शकबरहुकूम न्याय दिला आहे. गाण्यांमुळे सिनेमा सुपरहिट होतोच हे बॉलीवूडवाल्यांचे गृहीतक वापरतानाच त्याबाबत किंचित भाष्य दिग्दर्शकाने केले आहे. गुंड प्रवृत्तीकडून आपल्या बालनायकाला मारहाण होते आणि तो रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतो. रुग्णालयात मृत्युशय्येवरचा अक्रोड म्हणजे आपली लोकशाही आहे, असे सूचक आणि प्रतीकात्मक पद्धतीने दाखविण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. परंतु, मध्यंतरापूर्वीच्या गमतीजमती वगळता मध्यंतरानंतर ठरीव वळणाने आणि प्रचारकी खाक्यामुळे चित्रपट कंटाळवाणा ठरतो.
पार्थ भालेराव या बालकलाकाराने अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कोणतेही वलय न बाळगता उत्तम अक्रोड साकारला आहे.
भूतनाथ रिटर्न्स
निर्माते – भूषण कुमार, क्रिशन कुमार, रेणू रवी चोप्रा
दिग्दर्शक – नितेश तिवारी
लेखक – नितेश तिवारी, पियुष गुप्ता
संगीत – पलाश मुच्छाल, यो यो हनी सिंग, मीट ब्रॉस अंजान, राम संपत
कलावंत – अमिताभ बच्चन, पाथरे भालेराव, उषा जाधव, संजय मिश्रा, बोमन इराणी, अनुराग कश्यप, उषा नाडकर्णी, ब्रिजेंद्र काला.
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2014 रोजी प्रकाशित
धमाल पण प्रचारकी
फॅण्टसी, महानायकाची पूर्वीची अँग्री यंग मॅनची प्रतिमा, जे आपण करू शकत नाही असे सारे काही करण्याची हिंदी सिनेमाच्या नायकाची किमया आणि याचे सर्वसामान्य प्रेक्षकांना असलेले अप्रूप या गोष्टी गृहीत धरून हमखास यशाचा फॉम्र्युला बनतो.
First published on: 13-04-2014 at 02:43 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhoothnath returns review amitabh bachchan gets much more to do this time