Disha Patani : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या घराबाहेर ११ सप्टेंबर रोजी रात्री गोळीबार झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील सिव्हिल लाईन्स येथे घडली. या घटनेनंतर रोहित गोदारा गोल्डी ब्रार गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणातील हल्लेखोरांचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, असं असताना आता या प्रकरणात आणखी मोठी माहिती समोर आली आहे.
अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांनी गोळीबाराच्या घटनेबाबत एफआयआर दाखल केला असून या प्रकरणातील हल्लेखोरांचा नेमकं काय हेतू होता? याविषयीची माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांचं लक्ष्य दिशा पटानीचे वडील जगदीश पटानी होते अशी माहिती समोर आली आहे. प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य महाराज यांच्या कथित अपमानानंतर दिशा पाटनीच्या घराबाहेर गोळीबार झाल्याचं बोललं जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
वृत्तानुसार, बरेली पोलिसांकडे दाखल एफआयआरमध्ये असं दिसून आलं की ११ सप्टेंबर रोजी रात्री दिशा पटानीच्या घराबाहेर झालेला गोळीबार हा त्यांच्या वडिलांना लक्ष्य करून करण्यात आला होता. जगदीश पटानी यांनी सांगितलं की, “१२ सप्टेंबर रोजी पहाटे ३.३० वाजता त्यांच्या पाळीव कुत्र्यांनी भुंकण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांना झोपेतून जाग आली. तेव्हा त्यांना घराबाहेर दोघेजण दिसले. यावेळी त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात? यावेळी एका हल्लेखोराने म्हटलं की मार दो इसे. त्यानंतर त्यातील एकाने बंदूक काढून गोळीबार केला. पण त्यानंतर जगदीश पटानी यांनी बाल्कनीच्या खांबामागे लपून स्वतःला वाचवलं.”
दरम्यान, एफआयआरमध्ये म्हटलं आहे की हल्लेखोरांचा खून करण्याचा हेतू होता आणि जवळून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. तसेच घरातील आणि रस्त्यांवरील सीसीटीव्ही स्कॅन करत आहेत आणि कुटुंबाना सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. या घटनेत कोणतीही दुखापत झालेली नाही.