गेले साडे तीन महिने बिग बॉस १० च्या घरात स्पर्धकांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळाली. इंडिया वाले आणि सेलिब्रिटी स्पर्धकांमध्ये अखेर कॉमन मॅनमधून आलेल्या मनवीर गुर्जरने बाजी मारली. बिग बॉस १०च्या विजयाची ट्रॉफी मनवीरला मिळाली आहे. मनवीरने सेलिब्रिटी स्पर्धक बानी जेला सर्वाधिक मते मिळवून हरविले.

या शोमध्ये मनवीरची लोकप्रियता हळूहळू वरच्या पातळीला जाऊन पोहचली. सामान्य जनतेतून आलेला हा ‘मुंडा’ रातोरात सेलिब्रिटी बनला. त्याने अनेकांची मने तर जिंकलीच पण त्याने शोमध्ये मानही मिळवला. शीघ्र कोपी असलेला हा ‘गाव का छोरा’ सलमान खानच्या रिअॅलिटी शोचा विजेता बनेल असा कोणी विचारही केला नव्हता.  मनवीर हा बिग बॉसच्या घरातील असा स्पर्धक होता जो त्याच्या मित्रांना जवळ ठेवायचाच पण त्याच्या शत्रूंना त्याहूनही जास्त जवळ ठेवत असे. स्वामी ओम सारख्या व्यक्तिंना तो सहनशीलतेने आणि शांतपणे हाताळायचा. पण, अगदी समजूतदारपणे बिग बॉसमधील त्याच्या सहस्पर्धकांना हाताळणा-या मनवीरला एकदा त्याचा राग अनावर झाला. बिग बॉस १० चे विजेतेपद पटकाविल्यानंतर मनवीरने हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यासाठी त्याच्यात करण्यात आलेल्या बदलाविषयी सांगितले. बिग बॉस निर्मात्यांनी फायनलमध्ये पोहचलेल्या चारही स्पर्धकांचा मेकओव्हर केला. याविषयी सांगताना मनवीर म्हणाला की, काही दिवसांपूर्वी ग्रुमींग सेशन ठेवण्यात आले होते. तेव्हा स्टाइलिस्टने मला काहीही न विचारता माझे केस आणि दाढी कापली. मला तेव्हा इतका संताप आला होता. जर ते स्टाइलिस्ट बिग बॉसच्या घराबाहेर भेटले तर मी नक्कीच धडा शिकवेन, असा माझ्या मनात विचार आला होता. पण, हा शो कडून घेण्यात आलेला निर्णय असल्याने मी काहीच बोललो नाही. आता मी माझ्या घरी गेल्यावर पुन्हा दाढी वाढवेन आणि मला हवा तसा लूक ठेवेन. मनवीर बिग बॉसमध्ये आलेला तेव्हा त्याची दाढी मोठी होती. मात्र, मेकओव्हरमध्ये त्याची बरीच ट्रीम करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनवीर गुर्जर कोण आहे?
मनोज कुमार बैसोया म्हणजेच मनवीर गुर्जर हा दुग्ध व्यावसायिक आहे. नाकाच्या शेंड्यावर राग असणारा हा ‘देसी मुंडा’ ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणाऱ्या स्पर्धकांच्या शर्यतीत सर्वापेक्षा वरचढ ठरला. मनवीर मुळचा नोएडाचा आहे. गुर्जर समाजसुधारणेसाठीच्या कामात हातभार लावणाऱ्यांमध्ये मनवीरचे नाव घेतले जाते. नोएडामध्ये तो अनेक सभा आणि मोर्चांमध्ये सक्रिय असतो. समाजहिताची कामे करण्याव्यतिरिक्त मनवीर त्याचा व्यवसाय आणि त्याच्या नावे असणारी एक डेअरी चालवतो. जनमताच्या आधारावर अखेर सामान्य वर्गवारीतून बिग बॉसच्या घरात वर्णी लागलेल्या मनवीर गुर्जर अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला स्पर्धक ठरला होता. १६ आक्टोबर पासून सुरु झालेल्या बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सेलिब्रिटी आणि सामान्य व्यक्ती अशा दोन वर्गवारीतून स्पर्धक सहभागी झाले होते. सेलिब्रेटीसारखी सामान्य स्पर्धकालाही लोकप्रियता मिळू शकते हे मनवीरने शेवटच्या टप्प्यात दाखवून दिले.