तेजस्वी प्रकाश तिच्या बोलक्या आणि अतरंगी अंदाजामुळे बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांच्या तुलनेत जास्त चर्चेत असते. बिग बॉस १५ च्या विजेतेपदाची ती एक प्रबळ दावेदार मानली जात आहे. आपल्या मजेदार अंदाजात ती नेहमीच प्रेक्षकांचं आणि घरातील सदस्यांचं मनोरंजन करताना दिसली आहे. अनेकदा तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आताही काहीसं असंच घडलं आहे. तेजस्वीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. ज्यात तिने तिच्या आई- वडिलांच्या लग्नानंतरचा एक किस्सा शेअर केला आहे.

तेजस्वी प्रकाशच्या इन्स्टाग्राम हॅन्डलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या व्हिडीओची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. कारण यामध्ये तेजस्वीनं जो खुलासा केला आहे तो ऐकून सर्वच हैराण झाले आहेत. या व्हिडीओमध्ये तेजस्वी गार्डन एरियामध्ये शमिता शेट्टी आणि प्रतीक सहजपाल यांच्यासोबत बोलत बसलेली दिसत आहे.

व्हिडीओमध्ये सुरुवातीला तेजस्वी सांगते, ‘माझे बाबा NRI आहेत. माझ्याकडे दुबईचा रेसिडेंन्सी व्हिसा आहे. पण नागरिकत्व भारताचं आहे. त्यामुळे मी भारतात ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ राहू शकत नाही. अर्थात आता मी हे काढून टाकलं आहे. पण यामुळे मला सुरुवातीला बराच त्रास झाला. एकदा शूटिंग सुरु असताना मला सकाळी दुबईला जाऊन संध्याकाळी परत यावं लागलं. कारण माझे ६ महिने पूर्ण झाले होते त्यामुळे मला भारताच्या बाहेर जाऊन पुन्हा भारतात यावं लागलं.’ तेजस्वीचं बोलणं ऐकून प्रतीकही हैराण होतो.

त्यानंतर शमिता शेट्टी तेजस्वीला तिच्या आईबद्दल विचारते की, ‘त्या इथे राहत असतील ना.’ शमिताला उत्तर देताना तेजस्वी सांगते, ‘जेव्हा माझ्या आई- वडिलांचं लग्न झालं तेव्हा माझे बाबा लग्नानंतर एका आठवड्यातच आईला सोडून दुबईला निघून गेले होते. त्यांचं अरेंज मॅरेज होतं. ते दिड वर्ष परत आलेच नाहीत. त्यावेळी सर्व नातेवाईक आईला बोलायचे की त्याने तुला फसवलं, आता तो येणार नाही. हे सर्व ऐकल्यावर आई खूप वैतागली होती. आई-बाबा एकमेकांना पत्र पाठवत असत की, या तारखेला, या वेळी मी तुला पीसीओवर कॉल करेन. तेव्हा तिकडे दोघांचं बोलणं होत असे. पण आयएसडी कॉल असल्यामुळे ते महाग होते याचं दोघांनाही टेन्शन असायचं.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेजस्वी पुढे सांगते, ‘पण एक- दीड वर्षानंतर बाबा तिथे सर्व काही ठीक करून भारतात परत आले. नवीन घर घेतलं, चांगली कार खरेदी केली आणि नंतर आईला घेऊन पुन्हा दुबईला गेले. त्यानंतर सर्वजण आनंदी झाले आणि नंतर माझा जन्म झाला.’ सध्या सोशल मीडियावर तेजस्वीचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे.