तरुण पिढी लग्नसंस्थेपेक्षा लिव्ह इन रिलेशनशीपवर अधिक भर का देत आहे? त्यांना प्रेम निभावण्याची भीती वाटते की प्रेमाबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची…? या प्रश्नांना सरळसोट उत्तरं नाहीत. ज्याच्या त्याच्या प्रेमाची गोष्ट वेगळी. कुठल्याही व्यक्तीच्या जडणघडणीत त्याला आलेल्या अनुभवांचा, आई-वडिलांसह आजूबाजूला असलेल्या महत्त्वाच्या नात्यांचा प्रभाव त्या व्यक्तीच्या निर्णयावर पडतो. प्रेमभावनाही त्याला अपवाद नाही. प्रेमाच्या कैक गोष्टी मराठी-हिंदी चित्रपटातून आपण अनुभवत आलो असलो तरी काळानुसार त्याच प्रेमाची गोष्टही सतत बदलते. आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटात नव्या पिढीचा प्रेमाकडे, नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जसा दिसतो, तितकाच आधीच्या पिढीच्या प्रगल्भ होत गेलेल्या प्रेमाची गोष्टही पाहायला मिळते.

‘बिन लग्नाची गोष्ट’ या शीर्षकावरूनच ही प्रेमकथा लिव्ह इन रिलेशनशिप या विषयावर बोट ठेवणारी आहे हे स्पष्ट होतं. परदेशात राहणाऱ्या रितिका आणि आशय या दोघांची ही कथा आहे. या दोघांनी लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. आशयने घेतलेला हा निर्णय त्याच्या आई-वडिलांना मान्य नसल्याने ते त्याच्यापासून दुरावले आहेत. तर रितिकाला लग्न नको असण्यामागे तिच्या भूतकाळातील कडव्या आठवणी आहेत. तुला मी आणि मला तू… पुरेसं आहे की म्हणत नोकरीधंद्यात स्थिरावलेल्या आणि आपल्या छोट्या घरट्यात विसावलेल्या या प्रेमी जोडप्याला आजच्या क्षणाला मात्र कोणाच्या तरी आधाराची गरज भासते आहे. अशी गरज भासण्याचं कारण म्हणजे रितिका सात महिन्यांची गर्भवती आहे. लग्न न करताच मातृत्वाच्या टप्प्यावर असल्याने घरच्या सदस्यांकडून सहकार्याची अपेक्षा सोडाच… त्यांना सत्य सांगण्याचीही सोय आशयकडे नाही. आपण दोघंच मिळून सगळं करू असं म्हणणाऱ्या रितिकाचा आत्मविश्वासही एका क्षणी डळमळतो. अडचणीच्या वेळी इतरांना उपयोगी पडणाऱ्या, एकट्या लोकांचं ऐकून घेण्यासाठी, त्यांना आनंद वाटावा यासाठी मदत करणाऱ्या माधव तांबे नामक सद्गृहस्थाची त्यांच्या आयुष्यात एन्ट्री होते. एकटा माधव नव्हे तर त्यांच्याबरोबरीने त्यांची मैत्रीण उमाही त्यांच्या घरी राहायला येते. या दोघांच्या येण्याने रितिका आणि आशयच्या अडचणी कमी होतात का? लग्नाचं बंधन न मानून एकत्र पुढे जाणाऱ्या या दोघांच्या प्रेमाची गोष्ट सुफळ संपूर्ण होते का? हा सगळा कथाप्रवास ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटात पाहायला मिळतो.

‘बिन लग्नाची गोष्ट’ ही खऱ्या अर्थाने आजच्या पिढीची गोष्ट आहे. रितिकासारखी तरुणी परदेशात एकटीने शिक्षण पूर्ण करून स्थिरस्थावर होते. आशय हा तसा कुटुंबात रमणारा, आई-वडिलांच्या आज्ञेबाहेर नसलेला, पण एखादी गोष्ट आपल्याला आवडते म्हटल्यावर ती करायची आणि त्यात आपण चुकलोच तर त्याची जबाबदारीही घ्यायची हे धाडस त्याच्यात रितिकामुळे आलं आहे. माणूस कितीही स्वयंपूर्ण असला तरी एकटेपणा हा कुठल्याही टप्प्यावर आणि कुठल्याही कारणाने आला तरी तो वाईटच. पती-पत्नी किंवा प्रियकर-प्रेयसी यापलीकडे आपण प्रेमाची नाती जोडायला हवीत, माणसं जोडायला हवीत, हे भान माधव आणि उमाला त्यांच्या आयुष्यातील अनुभवांनी दिलं आहे. त्यामुळे त्यांच्यात असलेला हा प्रेमाचा प्रगल्भ दृष्टिकोन जेव्हा रितिका-आशयच्या आयुष्याशी जोडला जातो तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यातील विसंवाद दूर होतात. त्यांच्या बिन लग्नाच्या गोष्टीला अधिक रंग चढतो. एका विषयाचे बोट धरून दोन पिढ्यांची गोष्ट कधी समांतरपणे तर कधी एकमेकांना पूरक ठरेल, अशा पद्धतीने दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी केलेली मांडणी आणि निवेदिता सराफ, गिरीश ओक, प्रिया बापट आणि उमेश कामत ही सहज अभिनय करणारी ताकदीची कलाकार मंडळी यामुळे खऱ्या अर्थाने ही बिन लग्नाची गोष्ट अधिक सुफळ सुंदर झाली आहे. संजय मोने आणि सुकन्या कुलकर्णी यांचीही यात छोटेखानी भूमिका आहे. पूर्वार्धात किंचित रेंगाळल्यासारखा वाटणारा चित्रपट त्यातलं नाट्य अधिक खुलत जातं, तसतसं पकड घेत जातो. आजच्या काळाचं भान असलेली कथा ही या चित्रपटाची खरी ताकद म्हणता येईल.

बिन लग्नाची गोष्ट

दिग्दर्शक – आदित्य इंगळे

कलाकार – निवेदिता सराफ, गिरीश ओक, प्रिया बापट, उमेश कामत, संजय मोने, सुकन्या कुलकर्णी.