मृणाल ठाकूरचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती अभिनेत्री बिपाशा बासूबद्दल बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मृणालने स्वत:ची तुलना बिपाशा बासूशी करत तिच्यापेक्षा उत्तम असल्याचं म्हटलं होतं.

शिवाय पुरुषांसारखे स्नायू असलेल्या बिपाशाशी लग्न कर असं ती तिच्या सहकलाकाराला म्हटल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मृणालचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं. मृणाल ठाकूरच्या या व्हिडीओनंतर आता बिपाशा बासूनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिला चोख उत्तर दिलं आहे.

बिपाशाने या पोस्टमध्ये, “एक सशक्त स्त्री दुसऱ्या स्त्रीला प्रोत्साहन देते. सुंदर महिलांनो मसल्स बनवा…ते मसल्स तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी मदत करतात. महिला तंदुरुस्त असू शकत नाहीत हा जुना विचार काढून टाका.” स्वत:वर प्रेम करा हा हॅशटॅगही बिपाशाने वापरला आहे.

मृणाल ठाकूर काय म्हणालेली?

मृणाल ठाकूर त्या व्हिडीमध्ये तिचा सहकलाकार अरिजीतबरोबर फिटनेसबद्दल बोलत आहे. अरिजीत मृणालला हेडस्टँड आणि पुश-अप्सबद्दल सांगत आहे. त्यावर ती म्हणते की “तू अशा मुलीबरोबर लग्न केलं पाहिजे जिचे मसल्स असतील. जा आणि बिपाशा बासूबरोबर लग्न कर”. पुढे मृणाल म्हणते, “मी तिच्यापेक्षा चांगली आहे”.

मृणाल ठाकूर जेव्हा असं म्हणाली होती, तेव्हा बिपाशाने त्यावर काहीही प्रतिसाद दिला नव्हता. बिपाशाच्या सावळ्या रंगाबद्दलही अनेकदा बोललं जातं. पण तिने तिचा रंग बदलण्यासाठी कोणतीही सर्जरी केली नाही. या गोष्टीसाठी अनेकांना बिपाशाचं कौतुक वाटतं. बिपाशाने सांगितल्या प्रमाणे तिला अनेकदा रंगामुळे नाकारले गेले आहे.

बिपाशा बासू बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण ती सोशल मीडियावर सक्रिय असते. त्या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते. ती अनेकदा तिचा पती करण सिंग ग्रोव्हर आणि मुलगी देवीबरोबरचे तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तसेच बिपाशाला तिच्या वाढलेल्या वजनामुळे देखील अनेकदा ट्रोलही करण्यात आलं आहे .

याशिवाय, मृणाल सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. बऱ्याचदा एकत्र दिसल्यानंतर, मृणाल आणि धनुष डेटिंग करत असल्याच्या अफवा पसरू लागल्या होत्या. पण अभिनेत्रीने ते नाकारले आणि म्हणाली की ते फक्त मित्र आहेत.