बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण तिच्या आगामी हॉलिवूडच्या चित्रपटातून नव्या वर्षाची सुरुवात करणार आहे. एका अर्थाने दीपिका इंग्रजी वर्षीतील नवीन वर्ष आणि आपल्या आयुष्यातील नवीन वर्ष असा दुहेरी आनंद साजरा करत आहे. आयुष्याच्या नव्या वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी दीपिकाने कामाला प्राधान्य दिल्याचे दिसते. गुरुवारी ५ जानेवारीला दीपिकाचा ३१ वा वाढदिवस आहे. दीपिका आपला वाढदिवस कसा साजरा करणार याची तिच्या चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे.
मात्र सध्याच्या घडीला यशाच्या शिखरावर असणाऱ्या दीपिकाने आजही पार्टीपेक्षा स्वत:ला आपल्याला कामात झोकून दिल्याचे दिसते. वाढदिवसाचा आनंद अधिक काम करण्याचा जणू तिने संकल्पच केला आहे. यासाठी ती १५ तास काम करणार आहे. दीपिकाच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रचारासाठी सध्या मॅक्सिकोमध्ये आहे. तिचा आजचा दिनक्रम अधिक कामाचा असणार आहे. सकाळी ८ वाजता तिचा दिवस सुरु होणार असून रात्री ११ वाजेपर्यंत ती चित्रटाच्या कामात व्यग्र असणार आहे. यावेळी दीपिकासोबत तिच्या पहिल्या हॉलिवूडपटातील सहकलाकार विन डिझेल, रुबी रोस यांच्यासह ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटाची पूर्ण टीम असेल.
सध्याच्या घडीला दीपिकाचे नाव सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. एक मॉडेल म्हणून सुरु झालेला तिचा प्रवास आज एका यशस्वी अभिनेत्रीच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. ‘ये जवानी है दिवानी’, ‘पिकु’, ‘कॉकटेल’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटांमधून तिने साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. बॉलिवूडमध्ये छाप सोडल्यानंतर दीपिका पदुकोण आता हॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न ऑफ झेंडर केज’ दीपिकाचा पहिला हॉलिवूडपट १४ जानेवारीला सर्वप्रथम भारतामध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर २० जानेवारीला हा चित्रपट सर्व चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होईल. सध्या या चित्रपटाच्याच चर्चा सर्वत्र रंगत आहे.
२००७ साली ‘ओम शांति ओम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत अभिनेत्री दीपिका पदुकोणने या चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘ओम शांति ओम’, ‘बचना ऐ हसीनो’, ‘कॉकटेल’, ‘राम-लीला’, ‘बाजीराव-मस्तानी’ या आणि अशा बऱ्या चित्रपटांमधून दीपिकाने भूमिका साकारल्या आहेत. हॉलिवूडमध्ये पदार्पणास सज्ज असणारी दीपिका बॉलिवूडमधील ‘पद्मावती’ या चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूर आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसतील.