दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी टिपू सुलतान याच्या जीवनावर आधारित चित्रपटातील भूमिका स्विकारू नये, अशा इशारा तामिळनाडूतील भाजप आणि काही कट्टर हिंदुत्त्ववादी संघटनांनी दिला आहे. टिपू सुलतान हा हिंदुविरोधी असल्यामुळे रजनीकांत यांनी त्याची व्यक्तिरेखा साकारू नये, असे या संघटनांचे म्हणणे आहे. दरम्यान, रजनीकांत यांनी ही भूमिका स्विकारायची की नाही, याचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
टिपू सुलतानाने भारतावर आक्रमण करून येथील हिंदूंवर अत्याचार केले होते. त्याने केवळ येथील लोकांवरच नाही तर संस्कृतीवरही आक्रमण केले. ही गोष्ट रजनीकांत यांना माहित असल्याने ते कधीच टिपू सुलतानाला नायक म्हणून सादर करणारी भूमिका स्विकारणार नाहीत, असे भाजप नेते एल. गणेशन यांनी सांगितले. भाजपच्या जोडीला हिंदू मुन्नानी आणि हिंदू मक्कल काची या कट्टर हिंदूत्ववादी संघटनांनीही रजनीकांत यांना ही भूमिका स्विकारण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यांनी ही भूमिका नाकारावी अशी आमची मागणी आहे. कारण, टिपू सुलतानाची सत्ता असताना त्याने तामिळनाडूवर आक्रमण केले होते. त्यामुळे हा चित्रपट तामिळी जनतेचा अपमान करणारा असल्याचे हिंदू मुन्नानी संघटनेचे नेते रामगोपालन यांनी म्हटले. दरम्यान, निर्माते अशोक खेनाय यांनी केवळ प्रसिद्धीसाठी हा सगळा प्रकार सुरू असल्याचे सांगितले. आम्ही अजून या चित्रपटाच्या कामालाही सुरूवात केलेली नाही. गेल्या आठवड्यात मी फक्त तसा विचार बोलून दाखवला होता. त्यानंतर राजकीय पक्षांकडून आणि संघटनांनी त्याबाबत वाद निर्माण केला. मी काही वर्षांपूर्वी रजनीकांत यांच्याशी चित्रपटाबाबत चर्चाही केली होती. तेव्हा त्यांना ही कल्पना आवडली होती आणि त्यांनी मला त्यासाठी प्रोत्साहनही दिले होते. ते चित्रपटात काम करणार की नाही, याबद्दल तेव्हा काही ठरले नव्हते. मात्र, त्यांना ही कल्पना निश्चितच आवडली होती, असे अशोक खेनाय यांनी सांगितले. याशिवाय, हिंदू संघटनांनी दिलेल्या इशाऱ्याबद्दल बोलतान खेनाय म्हणाले की, हा चित्रपट बनवणे माझे स्वप्न आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडे लक्ष देणार नाही. कुत्रे कितीही भुंकले तरी हत्ती आपल्या चालीने चालत राहतो, असे विधानही त्यांनी यावेळी केले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Sep 2015 रोजी प्रकाशित
टिपू सुलतानाची भूमिका स्विकारू नका, हिंदुत्त्ववादी संघटनांचा रजनीकांतला इशारा
दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी टिपू सुलतान याच्या जीवनावर आधारित चित्रपटातील भूमिका स्विकारू नये
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:

First published on: 13-09-2015 at 13:01 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp hardliners warn rajinikanth against accepting film offer on tipu sultan