भारतीय जनता पार्टीचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या एका जाहिरातीवर आक्षेप घेत त्याच्यावर टीका केलीय. टायरच्या या जाहिरातीत आमिर खानने लोकांना दिवाळीच्या काळात रस्त्यावर फटाके न फोडण्याचा सल्ला दिला आहे. टायर कंपनी सीएट लिमिटेडच्या जाहिरातीवर आक्षेप घेत अनंत कुमार म्हणाले, “नमाजच्या नावाने रस्ता जाम करण्याची समस्या आणि अझान दरम्यान मशिदींमधून येणाऱ्या आवाजाच्या समस्येवरदेखील मग लक्ष केंद्रीत करावं.”
खासदार अनंत कुमार हेगडे यांनी या प्रकरणी कंपनीचे एमडी आणि सीईओ अनंत वर्धन गोयेंका यांना एक पत्र पाठवत या जाहिरातीची दखल घेण्याची विनंती केलीय. या जाहिरातीमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जाऊ शकता त्यामुळे कंपनीने याची दखल घेण्याची विनंती त्यांनी केलीय. या पत्रात ते म्हणाले, “आमिर खान लोकांना गल्ल्यांमध्ये फटाके न फोडण्याचं आवाहन करत आहे अशी तुमच्या कंपनीची नवी जाहिरात खूप चांगला संदेश देणारी आहे. या समस्येवर तुम्ही व्यक्त केलेल्या चिंतेचं कौतुक करायला हवं. त्याचप्रमाणे मी तुम्हाला आणखी एक समस्या मांडण्याची विनंती करतो. ती म्हणजे शुक्रवार आणि इतर सणांच्या दिवशी मुसलमानांनी नमाजच्या नावाने रस्ते जाम करणं”असं ते पत्रात म्हणाले.
Mumbai Drugs Case: अटकेमुळे आर्यन खानसमोर अडचणींचा डोंगर; ‘तो’ प्लॅनदेखील करावा लागला रद्द
यावेळी त्यांनी जाहिरातीवरून आमिर खानवर देखील निशाणा साधला आहे. “आजकाल, हिंदूविरोधी अभिनेत्यांचा एक गट नेहमीच हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र ते कधीही त्यांच्या समाजाच्या चुकीच्या कृत्यांवर भाष्य करत नाहित.” असं ते म्हणाले आहेत.

यावेळी अनंत कुमार हेगडे यांनी अझानमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावरही कंपनीने जाहिरातीच्या माध्यमातून लक्ष केंद्रीत करावं असं म्हंटलंय. तसचं ते म्हणाले, “सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल तुम्ही संवेदनशील आहात आणि तुम्हीही हिंदू समाजाचे आहात त्यामुळे मला खात्री आहे की गेल्या शतकांपासून हिंदूबाबत भेदभाव केला जातो हे तुम्हाला जाणवत असेल.” असं हेगडे म्हणाले.