बॉलीवूडमध्ये ‘रमैया वस्तवैया’ चित्रपटाने पदार्पण करणार अभिनेता गिरीश कुमार हा जवळपास एक वर्षापूर्वीच विवाहबद्ध झाल्याचे समोर आले आहे. खुद्द गिरीशनेच आपण एक वर्षापूर्वीच विवाहबद्ध झाल्याचे मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. गिरीशचे लग्न ११ फेब्रुवारी २०१५ रोजी झाले. पण, आपल्या करियवर याचा परिणाम होऊ नये म्हणून त्याने लग्नाची गोष्ट लपवून ठेवल्याचे मुलाखतीत सांगितले.

बॉलीवूड निर्माता रमेश तौरानी यांचा मुलगा असलेला गिरीश हा ‘रमैया वस्तवैया’ नंतर ‘लवशुदा’ चित्रपटात झळकला होता. गिरीशने इन्स्टाग्राम या सोशल साइटवर एक फोटो शेअर करून त्याचे बालपणीचे प्रेम असलेल्या क्रस्नाशी विवाह केल्याचे सांगितले. यास त्याने ‘माझे सर्वस्व….’ असे कॅप्शन दिले आहे. याविषयी मुलाखतीत बोलताना गिरीश म्हणाला की, मी आणि क्रस्ना बालपणापासूनचे मित्र आहोत. आम्ही शाळेत असताना एकमेकांना डेट करत होतो. मात्र, २००७ मध्ये आम्ही आमच्या नात्याविषयी गंभीर असल्याचे कळले. हे नाते पुढपर्यंत टिकवण्याचा आम्ही निर्णय घेतला. इतक्या वर्षांच्या प्रेमानंतर अगदी आनंदात लग्न करणा-या या अभिनेत्याने आपला विवाह जगापासून लपविण्याचा निर्णय घेतला. केवळ चित्रपटसृष्टीतील आपल्या कारकिर्दीवर याचा परिणाम होऊ नये म्हणून त्याने असे केले. याविषयी गिरीश म्हणाला की, क्रस्ना थोडी काळजीत पडली होती. पण, चित्रपटसृष्टीतील माझ्या कारकिर्दीविषयी मला जागरुक राहणं किती गरजेचं आहे तेही तिने समजून घेतलं. मात्र, आता मला अधिकृतपणे संपूर्ण जगाला माझे क्रस्नावर असलेले प्रेम सांगायचे आहे.

गिरीश आणि क्रस्नाने सिंधी विवाहपद्धतीने विवाह केला. हनीमूनसाठी या प्रेमीयुगुलाने युरोप, स्कॉटलँड, लंडन, इबिझा, बार्सेलोना आणि पॅरिस या ठिकाणांची निवड केली. लग्नाच्या दिवसाच्या आठवणी जागवताना क्रस्ना म्हणाली की, लग्नाच्या दिवशी मी मनिष मल्होत्राने डिझाइन केलेला १४ किलोचा लेहेंगा परिधान केला होता. त्या दिवशी गिरीशची नजर माझ्यावरून हटतच नव्हती. केवळ मला कॉफी घेता यावी म्हणून त्याने भटजी बुवांनादेखील थांबविले. सर्व विधींमध्ये मला काहीच खाण्यासाठी वेळ मिळाला नव्हता. या छोट्या गोष्टी खूप रोमॅण्टिक असतात.

gkum2

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या गिरीश त्याच्या वडिलांना संगीत विषयक प्रोजेक्ट्समध्ये मदत करत आहे.