सोनाक्षी सिन्हा आणि सिद्धार्थ मल्होत्रा ‘इत्तेफाक’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत. या चित्रपटातील त्यांचा लूक पाहता चित्रपटातील कथानकात गांभीर्य असल्याचे लक्षात येत आहे. पण, या चित्रपटाच्या सेटवर मात्र तसे वातावरण अजिबात नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गंभीर कथानक हाताळतानाही सिद्धार्थ, सोनाक्षी आणि सेटवरील प्रत्येकजण त्यांच्या परीने धमाल करण्यात व्यग्र असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे सिद्धार्थच्या सतत विनोद करण्याने सोनाक्षीलाही काही सुचेनासे झाले आहे.
‘रेड चिलीज ईएनटी’च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये सिद्धार्थ एका दृश्याच्या टेकच्या वेळी सोनाक्षीला खोडकरपणे त्रास देताना दिसत आहे. त्याचे क्षणात गंभीर आणि क्षणात विनोदी रुप पाहून सेटवरील इतरांनाही हसू आवरत नाहीये. सहसा चित्रपटाच्या सेटवरव कलाकारांमध्ये काही लहानशा कारणांवरुन खटके उडतात. पण, इत्तेफाकच्या सेटवर मात्र त्याचा लवलेशही नाही. आता हे खेळीमेळीचे वातावरण चित्रपटाच्या कमाईसाठी फायद्याचे ठरते का, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.
वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा
यश चोप्रा दिग्दर्शित ‘इत्तेफाक’ (१९६९)चा हा रिमेक आहे. जुन्या ‘इत्तेफाक’ चित्रपटात सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री नंदा यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर त्याच्या रिमेकमध्ये सोनाक्षी सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा, अक्षय खन्ना यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. करण जोहर आणि शाहरुख खान यांनी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली असून, ३ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये दाखल होत आहे.