बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एका गोंडस मुलाल जन्म दिलाय. सोशल मीडियावरुन अमृता आणि तिचा पती आरजे अनमोल यांनी ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. अमृता आणि अनमोलने मुलाचं नावं वीर असं ठेवलं आहे.
मुलाच्या जन्मानंतर जवळपास चार महिन्यांनी अमृताच्या मुलाचा फोटो समोर आला आहे. अमृताचा पती आरजे अनमोल याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलाचा एक गोड फोटो शेअर केला आहे. अनमोलने शेअर केलेला हा फोटो चांगलाच व्हायरल होतोय.
अनमोलने शेअर केलेल्या या फोटोत अमृता अनमोलसोबत लहानगा वीर खेळत असल्याचं दिसतंय. मनसोक्त हसणाऱ्या वीरकडे पाहून अमृता आणि अनमोलच्या चेहऱ्यावरही आनंद झळकतोय. “आमचं जग..आमचा आनंद” असं कॅप्शन त्यानं या व्हिडीओला दिलंय. या फोटोला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळताना दिसतेय.
View this post on Instagram
अनेक चाहत्यांनी या फोटोला कमेंट दिल्या आहेत. ‘किती गोड, खुपच सुंदर’ अशा कमेंट चाहत्यांनी या फोटोला दिल्या आहेत.
एका मुलाखतीत अमृताने मुलाचं नाव वीर ठेवण्याचं कारण सांगितलं आहे. “अनमोल आणि मी दोघही देशभक्त आहोत. अनमोलने हे नाव निवडलं आणि ते मलाही पसंत पडलं.” असं ती म्हणाली. तर अमृताने आई झाल्यानंतरचा अनुभव शेअर केला आहे. “वीरच्या जन्मानंतर मी रोज त्याच्याकडे पाहते आणि म्हणते हे रीअल आहे. पहिली गोष्ट जी बाळ आपल्याला शिकवतो ते म्हणजे वेळेचं नियोजन आणि शिस्त. मातृत्व म्हणजे भावनांचं मिश्रण आहे. रोज आपण चिंता, मनोरंजन,थकवा, प्रेम, आनंद अशा वेगवेगळ्या मूडमधून जात असतो.”
2002 सालात आलेल्या ‘अब के बरस’ या सिनेमातून अमृताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर इश्क विश्क, मै हूं ना,विवाह, हे बेबी अशा सिनेमांमधून ती झळकली. सध्या अमृताने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला आहे.