बॉलीवुडच्या चित्रपटांचा, गाण्यांचा आणि त्यातील नायिकांचा आपल्या भारतीय समाजावर खूप मोठा पगडा आहे. सर्व प्रेक्षकांचे विशेषत: तरुणाई आणि बॉलीवुडच्या अभिनेत्रींचे एक वेगळे नाते आहे. हे नाते केवळ आजच्या पिढीतच पाहायला मिळते आहे असे नाही तर त्या त्या काळातील तेव्हाच्या तरुण पिढीवर त्याचा प्रभाव पडलेला दिसून येतो. त्या तरुण वयात प्रत्येक जण आपली होणारी बायको, प्रेयसी किंवा मैत्रिण बॉलीवुडच्या त्या नायिकांमध्ये पाहात असतो. बॉलीवुडच्या त्या हिरॉईनशी लग्न करता येणे शक्य नसल्याने आपली होणारी ती किमान  तिच्यासारखीच असावी, असे त्याला वाटत असते.

रुपेरी पडद्यावरील ही नायिका वास्तव जीवनात एखाद्याशी लग्न करते तेव्हा तिच्या चाहत्यांना वाईट वाटतेच पण लग्नानंतर ती नायिका चित्रपट संन्यास घेऊन चित्रपट सृष्टीलाच रामराम ठोकते तेव्हा त्याला थोडा  जास्त धक्का बसतो. लग्नानंतर चित्रपटात काम करायचे नाही, असा निर्णय त्यांनी आपणहून किंवा सासरी आवडणार नाही म्हणून घेतलेला असतो. काही जणी लग्न, संसार, मुले-बाळे यात काही वर्षे घालविल्यानंतर पुन्हा रुपेरी पडद्याकडे वळतातही. तेव्हा बॉलीवूड आणि त्या नायिकेच्या चाहत्यांसाठी ते पुनरागमन आनंददायी व सुखकारक असते.

‘जगतसुंदरी’ असलेल्या ऐश्वर्य रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर काही वर्षे चित्रपट संन्यास घेतला होता. आता दीर्घ विश्रांतीनंतर ती पुनरागमन करत आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर व प्रिती िझटा या दोघींचे अलिकडेच ‘शुभमंगल’ झाले आहे. त्या चित्रपटातून तात्पुरती विश्रांती घेतात का हे लवककरच कळेल. पण बॉलीवुडच्या इतिहासावर नजर टाकली तर बॉलीवुडच्या काही नायिकांनी लग्नानंतर चित्रपट सृष्टीला रामराम ठोकला असल्याचे पाहायला मिळते. ‘गजनी’ चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळालेल्या असीन या दाक्षिणात्य अभिनेत्रीने राहुल  शर्मा बरोबर लग्न केले. आता तिचाही चित्रपट सृष्टीला रामराम करण्याचा विचार आहे.

करिष्मा कपूर, राणी मुखर्जी, रविना टंडन या नायिकांना एकेकाळी प्रसिद्धी आणि ग्लॅमर होते पण लग्नानंतर चित्रपटातून त्या फारशी चमक दाखवू शकलेल्या नाहीत. करिना कपूर, विद्या बालन, काजोल यांचे अपवाद म्हणावे लागतील. लग्नानंतर या रुपेरी पडद्यावर टिकून आहेत. पण काही जणींनी लग्नानंतर चित्रपट संन्यास घेतला आणि त्यांचा तो निर्णय आजही कायम राहिला आहे.  बॉलीवुडचे ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार व सायरा बानू यांचा विवाह तेव्हा गाजला. दिलीप कुमार यांच्यापेक्षा वयाने त्या लहान होत्या. पण लग्नानंतर सायरा बानू यांनी चित्रपट केले नाहीत. बॉलीवुडमधील कपूर घराणे प्रसिद्ध आहे. कपूर घराण्याच्या सूनबाईने चित्रपटातून काम करायचे नाही, असा नियम होता. राजकपूर यांचे सुपत्र रणधीर कपूरची बायको व अभिनेत्री बबिता यांनी हा नियम पाळला. रणधीर कपूरशी लग्न केल्यानंतर त्यांनी बॉलिवूडला रामराम केला. लोकप्रियता व ग्लॅमर सोडून त्यांनी संसाराची जबाबदारी पेलायचे ठरविले. ऋषी कपूरशी लग्न केल्यानंतर नितू सिंह यांनीही चित्रपटातून काम न करण्याचे ठरविले. आणि अनेक वर्षांनंतर ऋषी कपूरसह चित्रपटातून त्यांनी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पदार्पण केले.

‘मैने प्यार  किया’या पहिल्याच चित्रपटानंतर प्रसिद्धी मिळालेल्या भाग्यश्री पटवर्धन हिने हिमालयसोबत लग्न केले व चित्रपटाच्या झगमगटापासून ती दूर गेली. अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री हिनेही लग्नानंतर या ग्लॅमरपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने अक्षयकुमारशी लग्न केल्यानंतर तिनेही चित्रपट करणे थांबविले. ती  स्तंभलेखन व इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करत आहे. अभिनेत्री नर्गिस यांनीही सुनील दत्त यांच्याशी लग्न केल्यानंतर चित्रपट संन्यास घेतला होता. जया भादुरी यांनीही अमिताभ बच्चनशी लग्न केल्यानंतर काम न करण्याचा निर्णय घेतला.

खरे तर यश, प्रसिद्धी आणि ग्लॅमर मिळाल्यानंतर ते सोडणे कठीण असते. कारण या सगळ्याची सवय झालेली असते. पण अपरिहार्यता किंवा स्वत:हून घेतलेला निर्णय म्हणून बॉलिवूडच्या या सुंदरींनी लग्नानंतर चित्रपट संन्यास घेतला व या झगमगटापासून त्या दूर निघून गेल्या.

‘बंदिनी’

जुन्या पिढीतील अभिनेत्री नूतन यांनी लग्नानंतर चित्रपट संन्यास घेतल्याचे जाहीर केले होते. त्याच वेळी बिमल मुखर्जी हे ‘बंदिनी’ या चित्रपटाच्या तयारीत होते. मीनाकुमारी व वैजयंतीमाला या दोघींनी बंदिनीमधील भूमिका करण्यास नकार दिला होता. तेव्हा त्यांनी नूतनला विचारले पण तिने आपण चित्रपट संन्यास घेतला असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर बिमलदा यांनी बंदिनीची कथा बाजूस सारुन दुसरी कथा शोधायचे ठरविले. हे जेव्हा नूतनचे पती रजनीश बहल यांना कळले तेव्हा त्यांनी नूतनला ही भूमिका स्वीकारण्यास आणि चित्रपट संन्यासाचा घेतलेला निर्णय बदलण्यास भाग पाडले, असे सांगतात. नूतनने हा चित्रपट केला आणि तिच्या चित्रपट कारकिर्दीतील तो एक महत्वाचा चित्रपट ठरला. चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले, पुरस्कार मिळाले.