चीनमधून फैलाव झालेल्या करोना विषाणूचा प्रभाव हळूहळू वाढताना दिसत आहे. जगातील अन्य देशांप्रमाणेच या विषाणूने भारतातही शिरकाव केला आहे. त्यामुळे सरकारनेदेखील योग्य ती खबरदारी बाळगण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. यामध्येच शाळा, महाविद्यालये, मॉल्स, कॅफे, चित्रपटगृह यासारखी गर्दीची ठिकाणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे सरकारला मदत व्हावी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करता यावी यासाठी बॉलिवूड कलाकार एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे.

नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीने एक लघुपट तयार केला असून मुख्यमंत्री कार्यालयाने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या लघुपटामध्ये अमिताभ बच्चनपासून वरुण धवनपर्यंत अनेक कलाकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या लघुपटातून या कलाकारांनी नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसचं या काळात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करु नयेत हेदेखील सांगितलं आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) २० मार्च २०२० जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रोहित शेट्टीसह या लघुपटात झळकलेल्या कलाकारांचे आभार मानले आहेत.