बॉलीवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यांचा प्रवास खूप दुःखद आणि गूढतेने भरलेला आहे. आज आम्ही तुम्हाला अशा चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो बनवण्यासाठी २३ वर्षे इतका प्रदीर्घ कालावधी लागला.

या चित्रपटाबद्दल सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तो बनवताना त्याचे दोन मुख्य कलाकार आणि दिग्दर्शक यांचे निधन झाले. जेव्हा अभिनेत्याची जागा घेण्यात आली तेव्हा तोदेखील चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच जग सोडून गेला. त्यानंतर हा चित्रपट बॉलीवूडमधील सर्वांत दुर्दैवी चित्रपट मानला गेला.

या चित्रपटाची कथा आणि त्याच्याशी संबंधित घटना ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. एकीकडे चित्रपटात कलाकारांचे समर्पण दिसते; तर दुसरीकडे प्रत्येक वळणावर मृत्यूची सावली दिसते. त्याहूनही धक्कादायक म्हणजे हा चित्रपट अनेक वेळा थांबवण्यात आला आणि नंतर पुन्हा तो सुरू करण्यात आला; पण प्रत्येक वेळी काही ना काही अपघात झाला. अखेर हा चित्रपट कसातरी पूर्ण झाला आणि तो मोठ्या पडद्यावर आणण्यात आला.

या चित्रपटाचे नाव ‘लव्ह अँड गॉड’ होते, ज्याला काही लोक ‘कैस और लैला’ म्हणूनही ओळखतात. या चित्रपटाचे चित्रीकरण पहिल्यांदा १९६३ मध्ये सुरू झाले होते. त्यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक के. आसिफ होते आणि प्रसिद्ध अभिनेते गुरु दत्त यांना मुख्य भूमिकेत घेण्यात आले होते. लैलाच्या भूमिकेसाठी निम्मीची निवड करण्यात आली होती. पण, १९६४ मध्ये गुरु दत्त यांचे अचानक निधन झाले आणि हा चित्रपट अपूर्ण राहिला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटाचे चित्रीकरण थांबले.

गुरु दत्त यांच्या निधनानंतर दिग्दर्शक के. आसिफ यांनी हा चित्रपट बंद केला. काही वर्षांनी त्यांनी चित्रपट पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि संजीव कुमार यांना मुख्य भूमिकेत घेतले. त्यानंतर १९७० मध्ये चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरू झाले; परंतु याच काळात चित्रपटाचे दिग्दर्शक के. आसिफ यांचेही निधन झाले. हा त्यांच्या कारकिर्दीतील पहिला आणि शेवटचा अपूर्ण चित्रपट आहे. ते त्याचा रिलीज पाहू शकले नाहीत.

चित्रपटाचे दिग्दर्शक के. आसिफ यांच्या निधनानंतर चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा एकदा थांबले. चित्रपट बराच काळ अपूर्ण राहिला. त्यानंतर त्यांच्या पत्नी अख्तर आसिफ यांनी ते पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी चित्रपट निर्माते के. सी. बोकाडिया यांच्या मदतीने चित्रीकरण पूर्ण केले. चित्रपटाचे काही भाग तीन वेगवेगळ्या स्टुडिओंमध्ये चित्रित करण्यात आले. जेव्हा सर्व काही तयार झाले, तेव्हा १९८५ मध्ये संजीव कुमार यांचे निधन झाल्याची आणखी एक वाईट बातमी आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा प्रकारे हा चित्रपट बनवण्यासाठी २३ वर्षे लागली. सतत होणाऱ्या अपघातांमुळे त्याला बॉलीवूडच्या दुर्दैवी चित्रपटाचा दर्जा मिळाला. पण, सर्व अडचणी आणि दुःखांनंतर हा चित्रपट अखेर २७ मे १९८६ रोजी प्रदर्शित झाला. प्रेक्षकांसाठी हा चित्रपट केवळ एक प्रेमकथा नव्हता, तर त्यामागे लपलेला संघर्ष आणि शोकांतिकाही तितकीच खोल होती. आजही या चित्रपटात त्याच भावना दिसतात, ज्या दिग्दर्शकाला तो बनवताना दाखवायच्या होत्या.