‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या निमित्ताने खिलाडी कुमार आणि त्याच्या संपूर्ण टीमने प्रेक्षकांना आणि पर्यायी संपूर्ण समाजाला एका महत्त्वाच्या विषयावर विचार करण्यास भाग पाडलं. तो विषय म्हणजे महिलांच्या मासिक पाळीचा. सध्याच्या घडीला खिलाडी कुमार आणि त्याची संपूर्ण टीम ‘पॅडमॅन’च्या प्रसिद्धीसाठी विविध कार्यक्रमांना हजेरी लावतेय. या कार्यक्रमांमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसोबतच मासिक पाळीविषयीचे आपले विचार मांडण्यालाही प्राधान्य देण्यात येत आहे.

दिल्लीत पार पडलेल्या अशाच एका कार्यक्रमात अक्षय कुमारने आपलं मत मांडलं. ‘पॅडमॅन’च्या निमित्ताने आपल्याला एका वेगळ्या कथेवर काम करण्याची संधी मिळाली याकडे त्याने सर्वाचं लक्ष वेधलं. ‘मला नेहमीच अशा प्रकारच्या कथेवर काम करण्याची इच्छा होती. पण, काही वर्षांपूर्वी मी चित्रपट निर्मिती क्षेत्रात सक्रिय नव्हतो. आता मात्र ते शक्य आहे. कारण मी स्वत:सुद्धा चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलंय. माझ्या पत्नीने मला मुरुगानंदम यांच्याविषयी सांगितलं आणि त्यानंतर आम्ही थेट आर बाल्कींची भेट घेतली’, असं त्याने सांगितलं. या चित्रपटाच्या कथानकावर एक नजर टाकली तर, हॉलिवूडमध्येही अशा धाटणीचा चित्रपट साकारलेला नाही हा महत्त्वाचा मुद्दा अक्षयने यावेळी अधोरेखित केला. अनेकांनी मासिक पाळीविषयी माहितीपट, लघुपट साकारले पण, कोणीही त्यावर आधारित चित्रपट साकारण्यासाठी पुढे आलं नाहीयेत. त्यामुळे हा चित्रपट साकारण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, हे त्याने स्पष्ट केलं.

वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले

अक्षयच्या वक्तव्याशी सहमत होत मुरुगानंदम यांनीसुद्धा याविषयी त्यांचं मत मांडलं. सध्या सुरु असणारं #PadmanChallenge आणि त्याला सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून सर्वसामान्यांमध्ये अशाच प्रकारची जनजागृती पसरवण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘मला मासिक पाळीविषयी समाजामध्ये जनजागृती करायची होती. काही वर्षांपूर्वी याविषयी फक्त महिलाच उघडपणे बोलायच्या. पण, प्रत्येक घरात वडिलांना, भावाला, पतीला याविषयी माहिती असणंही तितकच महत्त्वाचं आहे. कारण, हा विषय फक्त महिलांपुरता सीमित नसून पुरुषांपर्यंतही त्याची व्याप्ती आहे’, असं ते म्हणाले. पुरुषांनीही याविषयी खुलेपणाने बोलावं यासाठीच ते आणि ‘पॅडमॅन’ची संपूर्ण टिम आग्रही असल्याचं यातून स्पष्ट झालं. सध्याच्या घडीला याविषयी पुरुषही खुलेपणाने बोलत असून खिलाडी कुमारने दिलेल्या या हटके चॅलेंजमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेकांपर्यंत या चित्रपटाच्या माध्यमातून देण्यात येणारा संदेश पोहोचला आहे असंच म्हणावं लागेल.