‘शोले’ चित्रपटात ठाकूर ही भूमिका करणारे दिवंगत अभिनेते संजीव कुमार यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यांचा अभिनय आणि संवाद लोकांच्या आजही लक्षात आहे. संजीव कुमार त्या काळातील आघाडीचे अभिनेते होते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहित होतं. संजीव यांना मांसाहार खूप आवडायचा. त्यासाठी त्यांनी एक घर भाड्याने घेतले होते, असं सचिन पिळगांवकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

सचिन पिळगांवकर कुणाल विजयकर यांच्या “खाने में क्या है” या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणालेले, “संजीव कुमार यांनी मांसाहारी जेवण करण्यासाठी एक वेगळे घर घेतले होते. त्यांचे कुटुंबीय शुद्ध शाकाहारी होते आणि घरात मांसाहार करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्यांनी पाली हिल परिसरात १-बीएचके फ्लॅट फक्त मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी भाड्याने घेतला होता.”

सचिन त्या काळातील आठवणींना उजाळा देत म्हणालेले, “त्यावेळी संजीव कुमार, शम्मी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, रणधीर कपूर आणि मी असे सगळे एकत्र जमून खाण्याचा आनंद घेत असायचो. ते पाया आणि निहारी मागवायचे. हे जेवण आम्हाला ४-५ वेळा गरम करावे लागत असे. कारण आम्ही पहाटे ५ वाजेपर्यंत बसून पीत असायचो आणि त्यानंतर नानबरोबर पायाचा आस्वाद घ्यायचो.”

अंजू महेंद्रू यांनीही सांगितलेला किस्सा

अभिनेत्री अंजू महेंद्रू यांनीही संजीव कुमार यांच्या मांसाहाराच्या आवडीबद्दल सांगितलं होतं. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणालेल्या, “हरी (संजीव कुमार) हे खाण्याचे प्रचंड शौकीन होते. चांगले पदार्थ आणि जेवण हेच त्यांच्यासाठी सगळं काही होतं. ते जरी गुजराती ब्राह्मण असले तरी त्यांना मांसाहारी पदार्थ खूप आवडायचे. ते नेहमी त्यांच्या घराबाहेर मांसाहार करायचे. ते कधीकधी माझ्या घरी यायचे आणि आम्ही त्यांच्या आवडीच्या मांसाहारी पदार्थांचे जेवण बनवायचो.”

संजीव कुमार यांनी ‘शोले’, ‘आंधी’, ‘खिलौना’, ‘अंगूर’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारल्या होत्या. १९८५ साली, वयाच्या अवघ्या ४७व्या वर्षी त्याचं निधन झालं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.