Aaishvary Thackeray Shared A Post : अनुराग कश्यप बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आहे. लवकरच तो एक नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याच्या या आगामी चित्रपटातून दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अशातच त्याने अनुरागसाठी खास पोस्ट केली आहे.
अनुराग कश्यपचा काल १० सप्टेंबर, बुधवारी वाढदिवस होता. यानिमित्त ऐश्वर्य ठाकरेने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अनुरागला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्याने अनुरागबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. अनुराग कश्यपने त्याला दिलेल्या संधीमुळे त्याने त्याचे आभारही मानले आहेत.
ऐश्वर्य ठाकरे झाला व्यक्त
ऐश्वर्य ठाकरे पोस्ट शेअर करत म्हणाला, “तुम्ही मला जे काही दिलं त्यासाठी मी खूप ऋुणी आहे. मी तुमच्याकडून खूप काही शिकलो आहे आणि कायम शिकत राहीन. तुम्ही मला मार्गदर्शन केलं आहे, मी याची कधीही अपेक्षा केली नव्हती. माझ्यासाठी तुम्ही फक्त दिग्दर्शक नाही तर तुम्ही माझे मार्गदर्शक, माझे शिक्षक, माझे मित्र आणि एवढंच काय तर तुम्ही मला वडिलांसारखे आहात. कितीही प्रयत्न केला तरी तुमच्यासाठी माझ्या मनात असलेलं प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी शब्द कमी पडतील.”
ऐश्वर्य ठाकरे पुढे म्हणाला, “गेल्या काही वर्षांपासून तुमच्याबरोबरच्या प्रवासामुळे माझ्यामध्ये खूप बदल झाले. फक्त अभिनेता म्हणून नाही तर एक माणूस म्हणूनसुद्धा. सिनेमातून प्रेक्षकांसमोर येण्यापूर्वीच माझ्या मनात या सगळ्याबद्दल खूप कृतज्ञता आहे. तुमच्या हाताखाली काम केल्याचा आनंद आहे आणि प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहावा यासाठी उत्सुक आहे.”
अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘नीशांची’ या चित्रपटातून ऐश्वर्य ठाकरे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. येत्या १९ सप्टेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.