प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने अभिनेत्री कल्की कोचलिनशी लग्न केलं होतं. ‘देव डी’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केल्यावर २०११ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. फक्त चार वर्षांच्या संसारानंतर, २०१५ मध्ये हे दोघे वेगळे झाले.
कल्की अनुराग कश्यपची दुसरी पत्नी होती. त्याच्या पहिल्या बायकोचं नाव आरती बजाज. अनुराग व आरती यांना आलिया नावाची एक मुलगी आहे. आलिया कश्यप हिचं ११ डिसेंबर २०२४ रोजी शेन ग्रेगोइरशी लग्न झालं. आलियाच्या लग्नात कल्कीने हजेरी लावली होती.
अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत कल्की म्हणाली की, घटस्फोटानंतर एखादी व्यक्ती त्या जोडीदाराशी संबंध तोडू शकते, पण त्या व्यक्तीमुळे भेटलेल्या इतर सर्व लोकांना आयुष्यात काढून टाकणं शक्य नाही. आलिया अशाच काही लोकांपैकी एक असल्याचं कल्कीने म्हटलंय. जेव्हा कल्की व अनुराग यांनी लग्न केलं होतं तेव्हा आलिया १० वर्षांची होती.
त्या लोकांशी संबंध तोडू शकत नाही – कल्की
अलिना डिसेक्ट्सशी बोलताना कल्की म्हणाली, “बरीच वर्षे झाली आहेत. आम्ही दोघेही आमच्या आयुष्यात पुढे गेलो आहोत. पण तो फक्त एकमेव नव्हता, ज्याला मी ओळखत होते. त्याच्या आजूबाजूच्या सर्व लोकांना मी ओळखते, खासकरून या इंडस्ट्रीत अचानक मी सर्व लोकांशी संबंध तोडू शकत नाही. सहा वर्षे ज्या जोडीदाराबरोबर होते, त्याच्यामुळे ३००-४०० नवीन लोक मला ओळखतात. तर, अर्थातच, ते संबंध अचानक तुटणार नाही, त्यामुळे आम्ही संपर्कात राहणं साहजिक आहे.”
अनुरागमुळे आयुष्यात खूप लोक आले – कल्की
आलियाबद्दल कल्की म्हणाली, “आलिया त्या लोकांपैकी एक आहे, जे अनुरागमुळे माझ्या आयुष्यात आहेत. नातं तुटल्यावरची एक चांगली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे त्या व्यक्तीमुळे तुम्ही भेटलेल्या इतर लोकांचे एक पूर्ण नेटवर्क असते. आणि जरी तुम्ही त्या व्यक्तीशी काही काळ बोलत नसाल तरी ते लोक मात्र आयुष्यात राहतात. हेच आमचं ब्रेकअप झाल्यानंतर घडलं.”
कल्कीने २०२३ मध्ये आलियाच्या साखरपुड्यालाही हजेरी लावली होती. तसेच तिने आलियाच्या लग्नानंतर एक सुंदर पोस्टही इन्स्टाग्रामवर केली होती. कल्कीने अनुरागपासून घटस्फोट घेतल्यानंतर गाय हर्शबर्गशी लग्न केलं आहे आणि त्यांना सॅफो नावाची पाच वर्षांची मुलगी आहे.