आमिर खानने नुकतीच वयाची साठी गाठली आहे. १४ मार्च रोजी अभिनेत्याचा वाढदिवस असतो. यावर्षी त्याने ६० व्या वाढदिवसानिमित्त पार्टीत खूप दारू प्यायली व नंतर तो त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी काय घडलं होतं हे सगळं विसरला असल्याचं त्याने म्हटलं आहे. यासह अभिनेत्याने त्याच्या दारूच्या व्यसनामुळे एकेकाळी तो निराशेत असल्याचंही सांगितलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने स्वत: याबाबत सांगितलं आहे. सध्या आमिर खान त्याच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
आमिर खानने नुकतीच ‘मॅशेबल इंडिया’ला मुलाखत दिली. यामध्ये त्याने दारू सोडल्याबद्दल सांगितलं आहे. आमिर खान म्हणाला, “माझ्या ६० व्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांनी माझ्यासाठी एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं, त्यामुळे तो दिवस खरंतर माझ्यासाठी अविस्मरणीय असायला पाहिजे होता. मी इतर वेळी दारू पित नाही. दारू पिणं सोडलं होतं. पण, त्या दिवशी खूप मोठी पार्टी असल्याने सगळ्यांनी मला दारू पिण्याचा आग्रह केला आणि माझ्याबद्दलची एक गोष्ट अशी आहे की मी स्वत:ला थांबवत नाही आणि मी फार दारू पित नसल्याने माझ्या शरीराला त्याची सवय नव्हती. आम्ही ७ वाजता पार्टीला सुरुवात केली आणि ९ पर्यंत मला कळलं होतं की मला जास्त होत आहे.”
आमिर खान याबद्दल पुढे म्हणाला, “माझ्याबरोबर पूर्वीसुद्धा काही वेळा असं झालं आहे. वाढदिवसाची पार्टी संपल्यानंतर मी जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा मला काहीच आठवत नव्हतं. व्हिडीओ व फोटो वगैरे होते. मला सांगण्यात आलं की, सगळ्यांनी वाढदिवसाला माझ्याबद्दल खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या वगैरे, पण मला ते काहीच आठवत नव्हतं; त्यामुळे माझ्या ६० व्या वाढदिवसाच्या माझ्याकडे कुठल्याच आठवणी नाही आहेत.”
यासह आमिर खानने काही वर्षांपूर्वी त्याने दारू पूर्णपणे सोडल्याचं सांगितलं होतं. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार मागच्या वर्षी नाना पाटेकर यांच्याशी एका मुलाखतीत संवाद साधताना त्याने म्हटलं होतं, “आता मी दारू सोडली आहे, पण पूर्वी मी खूप दारू प्यायचो. रात्र रात्र मी दारू पित असायचो. माझं स्वत:वर नियंत्रण नव्हतं. पूर्वी कधीही दारूचं सेवन न केलेला मी, आता खूप दारू प्यायला लागलो होतो. मी देवदाससारखा झालो होतो, जो स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न करतो. जवळपास एक ते दीड वर्ष मी निराशेत होतो.”