Aamir Khan’s Superhit Movie : प्रसिद्ध अभिनेता आमिर खानने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ९०च्या काळातील तो लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानला जायचा. ‘जो जिता वही सिकंदर’ ९०च्या काळातील त्याच्या काही गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. मन्सुर खान यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. अशातच नुकतंच मन्सुर यांनी या चित्रपटाबद्दल सांगितलं आहे
‘स्क्रीन’शी संवाद साधताना मन्सुर खान यांनी ‘जो जिता वही सिकंदर’ या चित्रपटातील कलाकारांच्या कास्टिंगबद्दल सांगितलं आहे. यामध्ये ते म्हणाले, कलाकारांच्या कास्टिंगबाबतचे त्यांचे निर्णय चुकले होते आणि यामुळे त्यांना चित्रपटाचं ६०-७० टक्के चित्रीकरण पुन्हा करावं लागलं. ते म्हणाले, “मी काही लोकांची निवड केली होती आणि त्यात मी चुकलो होतो. मी चित्रपटासाठी योग्य असलेल्या व्यक्तींना काढून चुकीच्या व्यक्तींची निवड केले होती.”
मन्सुर खान पुढे म्हणाले, “उटी, कान्नूर येथे ४०-४५ दिवसांचं चित्रीकरण झालेलं होतं. गाण्याचं चित्रीकरणही झालं होतं, पण तरीसुद्धा काहीच नीट घडत नव्हतं. मी नाव घेणार नाही, पण अशी काही माणसं होती, ज्यांचं वागणं फार चुकीचं होतं; त्यांच्यामुळे चित्रपटासाठी काम करणाऱ्या क्रू मेंबरलाही त्रास व्हायचा. चित्रपट खूप वाईट होत चालला होता. मी जवळपास चित्रपट पुढे पूर्ण न करण्याचा निर्णय घेतला होता. पण, चित्रपटाची कथाच इतकी प्रेरित करणारी आहे की मी निराश न होता त्या माणसांनाच चित्रपटातून काढून टाकलं; नंतर त्यांनी अनेक मुलाखतींमधून माझ्याबद्दल व आमिरबद्दल चुकीच्या गोष्टी सांगितल्या. पण, आम्ही काही लक्ष दिलं नाही, कारण आम्ही कामाला महत्त्व दिलं आणि त्याचे चांगले परिणाम आपल्या समोर आहेत.”
मन्सुर खान पुढे अभिनेता मिलिंद सोमणबद्दल म्हणाले, “या चित्रपटात मिलिंद सोमण शेखर मल्होत्राची भूमिका साकारणार होता, जी नंतर दीपक तिजोरीने साकारली. हा माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता. तेव्हा मिलिंद माझ्याकडे पुन्हा आला होता. खरंतर त्याची शरीरयष्टी पाहून मी त्याची चित्रपटासाठी निवड केली होती, पण शेवटी दीपकनेच चित्रपटात काम केलं. चित्रपटासाठी मिलिंदची निवड करण्याचा माझा निर्णय चुकला होता.”
मन्सुर खान यांनी यामध्ये सांगितलं की, आमिर खानने त्यांना चित्रपटातून या माणसांना काढून टाकण्यास सांगितलं होतं. नाहीतर या चित्रपटात अभिनेते मिलिंद सोमण आमिर खानसह महत्त्वाच्या भूमिकेत झळकले असते. २२ मे १९९२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यातील आमिर खानच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता, तर यातील गाणीदेखील चांगली गाजली होती.