Aamir Khan Talk About PK Movie : राजकुमार हिराणी दिग्दर्शित आणि आमिर खानची मुख्य भूमिका असलेला ‘पीके’ नावाचा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या पोस्टरवर आमिरचा न्यूड फोटो होता; त्यावरूनही वाद निर्माण झाला होता. इतकेच नाही तर या चित्रपटातून आमिरने हिंदू धर्मावर टीका केली असल्याच्या अनेक चर्चा झाल्या होत्या. अनेकांनी त्याच्या चित्रपटाला विरोध केला होता.
या चित्रपटाची कथा ही पाकिस्तानी मुलगा आणि भारतीय मुलगी यांच्यातील प्रेमाविषयी होती. ज्यामुळे अनेक वाददेखील निर्माण झाले होते. पण आमिरने या कथेचं समर्थन केलं. म्हणून त्याच्यावर लव्ह-जिहादसारखे आरोप करण्यात आले होते. अशातच आता दहा वर्षांनंतर आमिरने ‘पीके’ या चित्रपटाबद्दलच्या सगळ्या आरोपांवर आणि वादावर त्याचं मत व्यक्त केलं आहे.
आप की अदालतमध्ये आमिर याबद्दल म्हणाला, “आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. तो चित्रपट सामान्य माणसाला मूर्ख बनवण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी धर्माचा वापर करणाऱ्यांपासून सावध राहण्यास सांगतो. असे लोक प्रत्येक धर्मात आढळतील आणि याबद्दल सावध करणं हाच चित्रपटाचा एकमेव उद्देश होता.”
इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत आमिर म्हणाला, “जेव्हा दोन धर्मातील व्यक्ती एकत्र येतात. विशेषतः हिंदू आणि मुस्लीम, प्रेमात पडतात आणि लग्न करतात; तेव्हा प्रत्येक वेळेस ते लव्ह जिहाद असू शकत नाही. याला माणुसकी म्हणतात.” दरम्यान, आमिरची बहीण आणि अभिनेत्री निखतचे लग्न संतोष हेगडेशी झाले आहे; तर त्याची दुसरी बहीण फरहतचा पती राजीव दत्ता आहे.
प्रेम आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट आहे : आमिर खान
याबद्दल आमिर म्हणाला, “माझी बहीण निखतने संतोष हेगडे (हिंदू) यांच्याबरोबर लग्न केलं आहे. याला तुम्ही लव्ह जिहाद म्हणाल? माझी दुसरी लहान बहीण फरहतने राजीव दत्ता (हिंदू) याच्याबरोबर लग्न केलं आहे. याला तुम्ही लव्ह जिहाद म्हणाल? किंवा माझी मुलगा आयरा हिने नुपूर शिखरे (हिंदू) बरोबर लग्न केलं. याला तुम्ही लव्ह जिहाद म्हणाल? मला वाटतं प्रेम आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट आहे.”
पुढे आमिरने त्याला दोन्ही धर्मातील लोकांकडून ट्रोल केले जात असल्याने तो योग्य काम करत आहे हे सिद्ध होत असल्याचं मत व्यक्त केलं. तसंच इतर कोणताही अभिनेता त्याच्याइतका सामाजिकदृष्ट्या जागरूक नसल्याचं त्याने म्हटलं. याबद्दल तो म्हणाला की, “मला मुस्लीम असल्याचा अभिमान आहे. तसंच मला हिंदुस्थानी असल्याचाही अभिमान आहे आणि ही दोन्ही विधाने खरी आहेत.”
माझ्या मुलांची नावे माझ्या पत्नींनी ठेवली आहेत : आमिर खान
यापुढे त्याने मुलांची नावे मुस्लीम असल्याबद्दल असं म्हटलं, “माझ्या मुलांची नावे माझ्या पत्नींनी ठेवली आहेत. पहिली पत्नी रीनाने त्यांच्या मुलांची नावे जुनैद आणि आयरा ठेवली. आयरा हे (देवी) सरस्वतीचे दुसरे नाव आहे.” पुढे त्याने असा दावा केला की, इराचे नाव मनेका गांधी यांच्या ‘द पेंग्विन बुक ऑफ हिंदू नेम्स’ या पुस्तकातून घेतले आहे.
आमिरची दुसरी पत्नी किरण रावने मुलाचे नाव आझाद ठेवले. मौलाना आझाद हे स्वातंत्र्यसैनिक आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते. याबद्दल अमिर म्हणाला, “आझाद हे मुस्लिम नाव नाही. तुम्ही चंद्रशेखर आझाद यांच्याबद्दल ऐकले नाही का? ते देखील एक स्वातंत्र्यसैनिक होते.” दरम्यान, आमिरचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.