Aamir Khan on Marathi Language : आमिर खान सध्या त्याच्या ‘सितारे जमीन पर’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतीच त्याने यानिमित्त एक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्याने त्याला मराठी येत नसल्याने लाज वाटायची असं सांगितलं आहे. यासाठी त्याने चार वर्षे मराठीचे धडे घेतल्याचं म्हटलं आहे. आमिरने त्याला मराठी समजतं, पण व्यवस्थित बोलता येत नसल्याचं सांगितलं आहे.
आमिर खानने नुकतीच ‘मॅशेबल इंडिया’ला मुलाखत दिली. यामध्ये तो मराठी भाषेबद्दल बोलला आहे. या मुलाखतीत त्याला तुम्हाला मराठी बोलता येते असं आम्ही ऐकलं आहे, असं विचारण्यात आलं. यावर तो म्हणाला, “मला थोडं थोडं मराठी बोलता येतं.” आमिर पुढे म्हणाला, “जेव्हा मी ४४ वर्षांचा होतो तेव्हाची गोष्ट आहे, आता तर मी ६० वर्षांचा आहे. ही १५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा एक दिवस मला जाणवलं की मला हिंदी बोलता येतं, इंग्रजी बोलता येतं, पण मराठी बोलता येत नाही. जेव्हा कोणी मराठीत बोलत असतं तेव्हा मला ते काय बोलत आहेत हे समजतं. माझी मातृभाषा उर्दू मला बोलता येते पण वाचता येत नाही.”
आमिर खान पुढे म्हणाला, “माझी राज्यभाषा मराठी बोलता येत नसल्याची मला लाज वाटली, त्यामुळे मी मराठी शिकण्यासाठी शिक्षकाची मदत घेतली. सुहास लिमये यांनी मला मदत केली. त्यांनी मला मराठीचे धडे दिले. सुरुवातीला मी, किरण, जुनैद आणि आयरा चौघेही मराठी शिकायला बसायचो, पण त्यांच्यातील एक एकाने हळू हळू करत माघार घेतली. मी मात्र चार वर्षे सुहास यांच्याकडे मराठी शिकलो. “पुढे तो म्हणाला, “जेव्हा सुहास लिमये आणि मी मराठी शिकण्यासाठी भेटायचो, तेव्हा आम्ही अनेक विषयांवर गप्पा मारायचो. त्यांनी मला भाषेबद्दलचं महत्त्व समजावलं.”
दरम्यान, आमिर खान सध्या ‘सितारे जमीन पर’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. २० जून २०२५ ला आमिर खान व जिनिलीया देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानंतर आमिर खान त्याचं ड्रीम प्रोजेक्ट महाभारतवर काम करायला सुरू करणार आहे. याबाबत त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.