अब्दु रोजिक बिग बॉसच्या घरामध्ये आला आणि भारतीयांचा लाडका झाला. ‘बिग बॉस’च्या सोळाव्या पर्वामध्ये तो सहभागी झाला होता. या घरामध्ये तो शेवटपर्यंत टिकला. त्याच्या वागण्याने बोलण्याने सर्वांचंच मन जिंकलं होतं. सलमान खान देखील त्याच्यावर खुश झाला होता. ‘बिग बॉस’नंतर अब्दु सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामध्ये झळकणार असल्याचंही समोर आलं होतं. मात्र अब्दु या चित्रपटात दिसलाच नाही. यामागचं कारण आता त्याने स्पष्ट केला आहे.
सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट २१ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात सलमानबरोबरच पूजा हेगडे, शहनाज गिल महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसल्या. याचबरोबर या चित्रपटातून श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने बॉलीवूडमध्ये पाऊल टाकलं. याच चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान अब्दुला लॉन्च करणार होता. मात्र तया चित्रपटात न दिसल्याने त्याच्या चाहत्यांची निराशा झाली.
याबाबत बोलताना अब्दु म्हणाला, “मी या चित्रपटात काम करणार होतो. मी या चित्रपटासाठी शूटिंगही केलं होतं. पण माझे सीन्स चित्रपटाच्या कथेशी एकरूप होत नव्हते. निर्माते-दिग्दर्शकांना माझ्या सीन्समध्ये बदल कारायचे होते आणि त्यासाठी मला पुन्हा शूटिंग करावं लागणार होतं. पण त्यावेळी मी बिग बॉसच्या घरात होतो आणि तिथून चित्रपटाच्या शूटिंगसाठी बाहेर पडण्याची परवानगी मिळाली नाही. म्हणून मी याचं पुन्हा शूटिंग करू शकलो नाही आणि टीमने माझे सीन्स चित्रपटातून काढून टाकले.”
हेही वाचा : “हा वेडा झाला आहे का…?” ‘किसी का भाई किसी की जान’मधील नव्या गाण्यामुळे सलमान खान ट्रोल
दरम्यान, सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस पडला नाही. या चित्रपटाच्या गाण्यांना नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं होतं.