बॉलीवूड अभिनेता अभय देओल ४९ वर्षांचा आहे. त्याने अद्याप लग्न केलेलं नाही आणि त्याला मुलंही नाहीत. अभयची विवाहाबाबत भूमिका स्पष्ट आहे. आयुष्यात स्थैर्यासाठी लग्न हा एकमेव मार्ग नाही, असं त्याला वाटतं. अभय देओलला मोकळं, स्वावलंबी आणि बंधन नसलेलं नातं महत्त्वाचं वाटतं. त्यामुळेच तो लग्न व मुलं या पारंपरिक संकल्पनांपासून दूर राहिला आहे.
अभय देओलने डॉ. जय मदन यांच्याशी बोलताना लग्न व मुलं याबद्दल त्याचं मत व्यक्त केलं. आपल्या वेगळ्या दृष्टिकोनासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभयने पालकत्वाबद्दल विचार केला नसल्याचं सांगितलं. “मला मुलं नको आहेत. पण जर मला आयुष्यात सेटल व्हायचं असेल, तर मी स्वतःची मुलं होऊ देण्यापेक्षा दत्तक घेईन. कारण, मी या जगाकडे पाहिल्यावर मला वाटतं की, मी या जगात मूल का आणावं?” असं अभय म्हणाला.
अभयला तो या जगात आनंदी नाही का? असं विचारण्यात आलं त्यावर त्याने होकार दिला. “पण इतक्या वाढत्या लोकसंख्येचा भार पृथ्वीवर टाकता येणार नाही. आधीच जास्त असलेल्या लोकसंख्येत आणखी भर घालण्याचा प्रयत्न करायला नको. मला मुलं नको आहेत. खरं तर मूल असावं अशी माझी इच्छा असली तरी, मी या जगाकडे पाहतो आणि मला विचार येतो की, मी या जगात एका मुलाला का आणू?” असं अभय देओल म्हणाला.
बाळ असतं तर…
अभय देओलने पालकत्वाबरोबर येणाऱ्या भावनिक जबाबदारीबद्दलही मत व्यक्त केलं. तो म्हणाला, “मला माहिती नाही की मी ती जबाबदारी योग्यरित्या पार पाडू शकेन की नाही. मी कसं फील करेन मला माहित नाही. मी माझ्या भावना कशा सांभाळू शकेन? मला कल्पना नाही. जर माझं मूल असतं तर मी कदाचित माझ्या स्वभावापेक्षा जास्त हक्क गाजवणारा व कंट्रोलिंग असतो. कदाचित… हो, मी तसा असतो,” अशी कबुली अभय देओलने दिली.
कुटुंबातूनच संरक्षण वृत्ती आल्याचं अभयने सांगितलं. “ही कठीण परिस्थिती आहे. कधी कधी वाटतं की माझं बाळ असतं तर मी आता आहे तितका निवांत नसतो, नेहमी तणावाखाली असतो. मुलाच्या सुरक्षेची काळजी घेणारा व हक्क गाजवणारा असतो, कारण आमच्या बालपणात आम्हाला खूप जास्त जपलं गेलं, आणि मी तसंच माझ्या मुलांबाबतही करेन अशी शक्यता जास्त आहे,” असं तो म्हणालो.
अभय देओल शेवटचा २०२३ मध्ये आलेल्या ‘ट्रायल बाय फायर’ या चित्रपटात झळकला होता.