Abhishek Bachchan Answer To Troll : मनोरंजन विश्वातले अनेक पुरस्कार हे पैसे देऊन घेतले जात असल्याच्या चर्चा होत असतात. याबद्दल काही कलाकार मोकळेपणानं बोलतात, तर काही याबद्दल मौन बाळगणंच पसंत करतात. बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्यांवर पैसे देऊन पुरस्कार घेतल्याच्या टीका झाल्या आहेत. अशातच अभिनेता अभिषेक बच्चनवरही ही टीका होत आहे.

नुकत्याच झालेल्या ७०व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिषेक बच्चनला ‘I Want To Talk’ या चित्रपटासाठी ७०व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारताना अभिषेक अत्यंत भावूक झाला होता. २५ वर्षांनी त्याला हा फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. मात्र, या पुरस्काराबद्दल त्याच्यावर टीका होत आहे. अभिनेत्याने हा पुरस्कार पैसे देऊन घेतला असल्याची टीका केली आहे.

या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “तुम्ही तुमच्या करिअरमध्ये एकही ब्लॉकबस्टर किंवा हिट सिनेमा केला नसेल, तरी पुरस्कार खरेदी करून आणि PR करून तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता, याचं उदाहरण म्हणजे अभिषेक बच्चन. सांगताना वाईट वाटतं की, अभिषेक हा एक आदर्श उदाहरण आहे की, तुम्ही पुरस्कार खरेदी करून आणि PR करून प्रसिद्ध होऊ शकता.”

त्याने यंदा I Want To Talk साठी फिल्मफेअर पुरस्कार जिंकला. पण, हा चित्रपट काही मोजक्या पैसे दिलेल्या समीक्षकांव्यतिरिक्त कोणीही पाहिला नाही आणि आता मी सर्व ट्विट्स पाहतोय, जिथे २०२५ त्याचं वर्ष आहे असं सांगितलं जात आहे, हे खूप मजेशीर आहे. त्याच्यापेक्षा खूप चांगले अभिनेते आहेत, ज्यांना अधिक ओळख, प्रशंसा आणि पुरस्कार मिळायला हवेत; पण दुर्दैवाने त्यांच्याकडे योग्य PR आणि पैसे नाहीत.”

या टीकेवर अभिषेकने संयमीपणे उत्तर दिलं आहे. अभिषेकनं या पोस्टवर त्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत म्हटलंय, “माझ्याकडून कधीही कोणताही पुरस्कार खरेदी केला गेला नाही किंवा मी काही PR केलेला नाही. हा पुरस्कार फक्त कठोर परिश्रम, कष्ट आणि घाम गाळून मिळालेला आहे.” यापुढे अभिषेक टीका करणाऱ्या ट्रोलर्सला उद्देशून म्हणतो, “माझं हे सांगण तुम्ही मान्य कराल की नाही अशी मला शंका आहे, त्यामुळे तुम्हाला योग्य ते उत्तर देण्याचा उत्तम मार्ग म्हणजे मी आणखी मेहनत करेन, जेणेकरून माझ्या भविष्यातील कोणत्याही यशावर तुम्हाला शंका येऊ नये; मी तुम्ही चुकीचे आहात हे सिद्ध करेन.”

टीकाकाराला अभिषेक बच्चनचं स्पष्टपणे उत्तर

दरम्यान, २५ वर्षांच्या अपार मेहनतीनं यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला. यावेळी अभिषेक भावूक होत म्हणालेला की, हा पुरस्कार म्हणजे २५ वर्षांच्या मेहनतीचं फळ आहे. तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या. या पुरस्कारामागे “ऐश्वर्या आणि आराध्या यांनी खूप मोठा त्याग केला आहे. हा पुरस्कार मी खास व्यक्तींना अर्पण करतो आणि त्या व्यक्ती म्हणजे माझे वडील व माझी मुलगी.”