अभिनेते किरण कुमार यांनी आतापर्यंत अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी सलमान खान, शिल्पा शेट्टी, सुनील शेट्टी यांच्याबरोबर चित्रपट केले आहेत. किरण यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सलमान खान व त्याचे वडील सलीम खान यांचे आभार मानले आहेत. सलमानच्या कुटुंबाची करिअरमध्ये कशी मदत झाली, ते किरण यांनी सांगितलं. तसेच सलमान व त्याच्या वडिलांशी संबंधित एक किस्साही त्यांनी शेअर केला.
कुनिका सदानंदला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता किरण कुमार यांनी सांगितलं की त्यांचे वडील व सलीम खान चांगले मित्र होते. सलीम यांच्या सल्ल्यामुळेच किरण यांना वडिलांनी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलं होतं. मुंबईला परतल्यावर किरण यांचं खान कुटुंबाशी खास कनेक्शन झालं. किरण यांनी हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यावर सलीम यांनी त्यांना आपल्या चित्रपटात भूमिका ऑफर केली होती.
“सलीम साहेब माझे गार्डियन आहेत. मी अनेकदा त्यांना भेटायला जातो. आम्ही एकत्र कॉफी पितो. जेव्हा त्यांचा मुलगा सोहेल खान ‘औजार’ चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करणार होता, तेव्हा मी त्या चित्रपटात काम केलं होतं. मी सलमान खानबरोबरही अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे,” असं किरण कुमार म्हणाले.
सलमानच्या कुटुंबाबद्दल किरण कुमार यांचे वक्तव्य
किरण पुढे म्हणाले, ”सलमान खानच्या कुटुंबासारखं कुटुंब भेटणं खूप दुर्मिळ आहे. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य खूप चांगला आहे. सलमान खानचे स्टारडम हे त्याच्या कुटुंबाच्या चांगल्या कर्मांचे फळ आहे. सलमानचं मन खूप मोठं आहे आणि त्याचं श्रेय त्याचे वडील सलीम खान यांना जातं.”
किरण कुमार यांनी सांगितला किस्सा
सलीम खानचे कधीच आभार मानू शकलो नाही, असं किरण कुमार म्हणाले. पण एका रात्री दारू पिऊन किरण यांनी सलमान आणि सलीम खान यांच्या होर्डिंग्जसमोर बसून त्यांचे आभार मानले होता. “सलीम खान यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय. एके दिवशी मी एका पार्टीतून येत होतो. मी खूप दारू पिऊन होतो. वाटेत मला सलमान खान आणि सलीम खानच्या ब्रँड बीइंग ह्युमनचे एक आउटलेट दिसले. बाहेर मला सलमानचे होर्डिंग दिसले. मी खूप दारू पिऊन होतो. पहाटेचे २:३० वाजले होते. मी माझी गाडी थांबवली, खाली उतरलो आणि दुकानाच्या पायऱ्यांवर बसलो आणि सलीम खान आणि सलमान खान यांचे खूप आभार मानले,” असं किरण कुमार यांनी सांगितलं.
किरण कुमार यांनी सलमान खानबरोबर ‘प्यार किया तो डरना क्या’ व ‘ये है जलवा’ या सिनेमात काम केलं. तसेच ‘धड़कन’, ‘विरासत’, ‘इंसाफ मैं करूंगा’, ‘LOC कार्गिल’, ‘जानी दुश्मन’, ‘आप मुझे अच्छे लगने लगे’ अशा इतर अनेक चित्रपटांमध्ये किरण कुमार यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.