Actress Shilpa Shirodkar : ‘किशन कन्हैया’, ‘हम’, ‘आँखें’ अशा गाजलेल्या बॉलीवूड सिनेमांमध्ये काम करणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री लग्नानंतर परदेशात स्थायिक झाली. जवळपास १३ वर्षे ती बॉलीवूडपासून दूर होती. मात्र, त्यानंतर या अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यात अशा काही घटना घडल्या; ज्यामुळे तिने परदेशातून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. या अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊयात…

९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये शिल्पा शिरोडकरचं नाव घेतलं जातं. मात्र, लग्नानंतर अभिनेत्रीने बॉलीवूडला रामराम ठोकला होता. तिने मनोरंजनसृष्टीतून जवळपास १३ वर्षांचा ब्रेक घेतला होता, या काळात अभिनेत्री लंडनमध्ये आपल्या कुटुंबीयांसह राहत होती. २०१० मध्ये शिल्पा पुन्हा मुंबईत परतली आणि तिने काही वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक केलं.

२०१० मध्ये लंडनहून मुंबईत परतण्यामागे वेगळंच कारण होतं, शिल्पा शिरोडकरने याबद्दल ‘पिंकव्हिला’शी संवाद साधताना खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली, “मला भारतात परतल्यावर चित्रपट मिळाले नाहीत आणि मी तसे प्रयत्नही केले नाहीत. खरंतर टेलिव्हिजनवर कमबॅक करायचं असा कोणताच हेतू माझा नव्हता. माझ्या आई-बाबांच्या निधनामुळे मी पूर्णपणे नैराश्येत होते. या काळात मला माझ्या बहिणीच्या ( नम्रता शिरोडकर ) जवळ राहायचं होतं. इथे पुन्हा येऊन काम करायचं वगैरे असं काहीच ठरवलं नव्हतं, कामासाठी मी कोणालाच फोन वगैरे सुद्धा केले नव्हते.”

शिल्पा पुढे म्हणाली, “माझ्याकडे पीआरचे संपर्क नव्हते, फोटोशूट केलेलं नव्हतं…काहीच नव्हतं. त्यावेळी मला ‘एक मुट्ठी आसमान’ या शोबद्दल स्वत:हून विचारणा झाली होती. मला एवढंच सांगण्यात आलं होतं की, प्रॉडक्शन हाऊस चांगलंय, निर्माते चांगले होते. त्यांनी मला ज्या-ज्या गोष्टी सांगितल्या, ते सगळं मला आवडलं आणि वाहिनी सुद्धा माझ्या कमबॅकसाठी उत्सुक होती. काम आपोआप माझ्याकडे आलं होतं.”

…म्हणून भारतात परतण्याचा निर्णय घेतला, अभिनेत्री काय म्हणाली?

“माझ्या आई-बाबांचं निधन झाल्यावर मी प्रचंड खचले. माझे पती आणि माझी मुलगी अनुष्का यांच्याबरोबर मी तेव्हा लंडनमध्ये होते. माझे पती अपरेश त्यांच्या कामाच्या क्षेत्रात खूपच यशस्वी होते. त्यांची नोकरी फार चांगली होती. पण, माझ्या आई-बाबांच्या निधनाच्या धक्क्यातून मी सावरू शकत नव्हते, माझ्यावर उपचार सुरू होते. अलीकडच्या काळात सगळे असं म्हणतात, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. मला असं वाटतं माझ्या बाबतीत हे उलट झालं, प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे एक खूप- खूप समजूतदार नवरा असतो. माझा नवरा प्रचंड समजूतदार आणि सहनशील आहे. कारण, २०१० मध्ये जेव्हा मी भारतात परतण्याचा निर्णय घेतला तेव्हा अपरेशची कारकीर्द यशाच्या शिखरावर होती आणि तो माझ्यासाठी सर्वकाही सोडून भारतात आला. त्याने नोकरी सोडली…आणि मला म्हणाला चला काहीतरी नवीन करून पाहुयात.” असं शिल्पा शिरोडकरने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिप्रेशनविषयी सांगताना शिल्पा म्हणाली, “नैराश्येत असताना मी प्रचंड रडायचे, अश्रूंवर नियंत्रण राहत नव्हतं. काही चांगल घडलं तरी मी रडणं थांबवू शकत नव्हते. मला कशातही रस नव्हता… एका रोबोटप्रमाणे आयुष्य झालं होतं. त्यात माझं वजन वाढलं, डोळ्याखाली डार्क सर्कल आले होते…मला आयुष्यात काहीच रस नव्हता. मी बाहेर जात नव्हते, फक्त मुलीला शाळेत सोडायला आणि आणायला जायचे. त्यावेळी मला माझं डोकं भिंतीवर आपटावं असं सतत वाटायचं…माझी मनस्थिती प्रचंड गोंधळलेली होती. त्यावेळी अपरेशवर विनाकारण चिडचिड व्हायची, माझ्या मुलीवर सुद्धा मी चिडायचे. तेव्हा मी फक्त माझ्या बहिणीशी ( नम्रता ) बोलायचे म्हणूनच, भारतात येण्याचा निर्णय घेतला होता.”