Huma Qureshi cousin brother murdered in Delhi : बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी याची हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री ११ वाजता दिल्लीतील निजामुद्दीनमधील जंगपुरा भोगल लेनमध्ये ही घटना घडली. पार्किंगच्या वादातून आसिफची हत्या झाली, असं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसिफ आणि इतर दोघांचा त्याच्या घराच्या मुख्य गेटसमोर दुचाकी पार्किंग करण्यावरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी आसिफवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हल्ल्यात आसिफ गंभीर जखमी झाला होता. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
आसिफच्या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आसिफची पत्नी आणि नातेवाईकांनी आरोप केला की आरोपींनी क्षुल्लक कारणावरून अमानुषपणे आसिफवर हल्ला केला. आसिफची पत्नी सायनाज कुरेशी हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी यापूर्वीही पार्किंगच्या मुद्द्यावरूनच आसिफशी भांडण केलं होतं.
नेमकं काय घडलं?
गुरुवारी आसिफ कामावरून परतला तेव्हा त्याला शेजाऱ्याची दुचाकी घराच्या मुख्य गेटसमोर उभी असलेली दिसली, ती त्याने तिथून हटवयला सांगितली. मात्र, गेटसमोरील दुचाकी हटवण्याऐवजी, शेजाऱ्यांनी आसिफला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि नंतर त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला, असा आरोप तिने केला.
आसिफच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना शोध घेत त्यांना अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.