‘सेक्रेड गेम्स’ फेम अभिनेत्री कुब्रा सैतने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण काळाबद्दल अनेकदा सांगितलं आहे. वन नाइट स्टँडनंतर गरोदर राहिलेल्या कुब्राने गर्भपात केला होता, तसेच त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम झाला होता. आता अश्नीर ग्रोव्हरच्या ‘राईज अँड फॉल’ या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या कुब्राने भविष्यात मुलं नको, असं वक्तव्य केलं आहे.
इतर स्पर्धकांशी बोलताना ४२ वर्षांची कुब्रा म्हणाली, “मला मुलं नको आहेत. मला मूल जन्माला घालण्यात रस नाही. मी ३० वर्षांची असताना चुकून गरोदर राहिले होते तेव्हा मी गर्भपात केला होता. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता.” कुब्रा सैत ‘वन नाइट स्टँड’नंतर गरोदर राहिली होती, तिने त्या बाळाला जन्म न देण्याचा निर्णय घेतला आणि गर्भपात केला.
बाळाची जबाबदारी घेण्याबद्दल कुब्रा म्हणाली…
गर्भपात ही अत्यंत खासगी गोष्ट आहे, त्याबद्दल जाहीरपणे बोलणं कंफर्टेबल वाटतं का? असं कुब्राला विचारण्यात आलं. “मी त्याबद्दल माझ्या पुस्तकात लिहिलं आहे. मी त्या माणसाबरोबर बसले होते, तो म्हणाला की मला हवं ते मी करू शकते. मग मी विचार केला की जर या माणसाला काही फरक पडत नसेल तर मी काय करू? मी ही जबाबदारी एकटी स्वतःवर कशी घेऊ शकते? मी या मुलाला जन्म देऊन त्याची पुरेशी जबाबदारी घेऊ शकते का, याचा विचारही मी केला होता,” असं कुब्राने नमूद केलं.
त्याने बाळाची जबाबदारी घेतली असती तर…
एका स्पर्धकाने विचारले की जर त्या पुरूषाने बाळाची जबाबदारी स्वीकारली असती, तर तिने बाळाला जन्म दिला असता का? “तसं असतं तर ती परिस्थितीच पूर्णपणे वेगळी असती. पण त्यानंतर मी खूप अस्वस्थ झाले, कारण मी हे कोणाशीही शेअर केलं नव्हतं. या सर्व गोष्टी मनात ठेवून मी शांत होते,” असं कुब्रा म्हणाली.
कुब्रा पुढे म्हणाली, “लहानपणीच जेव्हा तुमच्यावर अत्याचार होतात आणि कौटुंबिक परिस्थिती सामान्य नसते, तेव्हा तुम्ही बाहेर आधार शोधता. तो आधार बरोबर आहे की चूक, त्याचा विचार तुम्ही करत नाही. मी स्वतःच धडपडले आणि नंतर सावरले.”
अश्नीर ग्रोव्हरच्या ‘राईज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोचे एपिसोड्स दुपारी १२ वाजता अमेझॉन एमएक्स प्लेयरवर मोफत प्रसारित केले जातात आणि रात्री १०:३० वाजता SET वर प्रसारित होतात. कुब्रा सैत व्यतिरिक्त या शोमध्ये संगीता फोगट, अर्जुन बिजलानी, नयनदीप रक्षित, आरुष भोला, आहाना कुमरा, किकू शारदा आणि इतर स्पर्धक आहेत.