Veteran Bollywood Actress Was Thrown Out Of The House By Her Father : टीव्ही, सिनेमा यांपासून मिळत असलेल्या प्रसिद्धीमुळे अनेक पालक त्यांच्या मुलांना काहीवेळा त्यांच्या इच्छेविरुद्ध या क्षेत्रात काम करण्यास आग्रह करतात असं म्हटलं जातं. असंच काहीसं दिग्गज बॉलीवूड अभिनेत्रीबरोबरही घडलं होतं. लहान वयातच वडिलांनी या क्षेत्रातून मिळत असलेल्या पैशाखातर त्यांना अवघ्या चार वर्षांच्या वयातच काम करण्यास सांगितलं.
दिवंगत अभिनेत्री मीना कुमारी यांनी बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांत काम करत मोठं नाव कमावलं होतं. यासह त्या लहान वयातच कुटुंबीयांचा आधार बनल्या होत्या. मीना यांना अभिनयाचा तसा वारसा नव्हता, पण त्यांचे वडील संगीतकार होते. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार पाकिस्तानहून ते मुंबईत आलेले. अली बक्ष असं त्यांचं नाव होतं. त्यांना व त्यांच्या पहिल्या पत्नीला ३ मुली होत्या, परंतु त्यांना सोडून ते इकडे आले आणि त्यांनी प्रभावती या हिंदू महिलेशी लग्न केलं, नंतर त्यांचं नाव इक्बाल बेगम असं करण्यात आलं. या दोघांना तीन मुली होत्या; खुरशीत, मीना व मधू.
असं म्हटलं जातं की, अली मीना यांच्या जन्मामुळे दुःखी होते. काही अहवालांनुसार असंही म्हटलं जातं की, त्यांनी मीना यांना अनाथ आश्रमातही सोडलं होतं. मुंबईतील त्यांच्या घराशेजारीच एक अनाथ आश्रम होतं. मीना यांनी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर काम केलं तेव्हा त्या फक्त चार वर्षांच्या होत्या. तेव्हा त्यांना याची कल्पनाही नव्हती की, त्यांचा हा प्रवास खूप लांबचा आणि न संपणारा असेल.
विनोद मेहता यांनी लिहिलेल्या ‘मीना कुमारी द क्लासिक बायोग्राफी’ या पुस्तकात मीना यांनी असं म्हटलं आहे की, “पहिल्या दिवशी काम केलं तेव्हा मला असं वाटलेलं की, मी लहान मुलं करतात त्या सगळ्या गोष्टींपासून दुरावली जाणार आहे. पण, मला असंही वाटलेलं की फक्त काही दिवसंच स्टुडिओमध्ये जावं लागेल त्यानंतर मी शाळेत जाईन, काही गोष्टी शिकेन आणि माझं आयुष्यसुद्धा इतर मुलांप्रमाणेच असेल. पण, तसं काही घडणार नव्हतं.”
मीना यांचे वडील अली यांच्या मते मुलींना शाळेत पाठवणं म्हणजे अनावश्यक खर्च आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या तिन्ही मुलींना काम करण्यास भाग पाडलं. त्यांना याबाबत काही कळण्यापूर्वी त्या घरातील कमावत्या झाल्या होत्या. त्यांच्याबाबतचे सर्व निर्णय त्यांचे वडील घेत असत. त्यांना स्वत:बाबत कोणताही निर्णय घेण्याची त्यांनी परवानगी दिली नव्हती.
मीना कुमारी यांच्यावर लहान वयातच होती कुटुंबियांची जबाबदारी
मीना यांनी पहिल्यांदा ‘लेदर फेस’ या चित्रपटात काम केलेलं. चित्रपटाचे दिग्दर्शक विजय भट्ट होते व त्याकाळी त्यांना या कामाचे २५ रुपये मिळाले होते. त्यांच्या वडिलांना माहीत होतं की मीना पुढे जाऊन खूप पैसा कमावणार आहेत. ‘आरएसटीव्ही’शी संवाद साधताना विनोद म्हणालेले की, “मीना त्यांच्या घरातील कमावत्या झाल्या होत्या. त्यांचं बालपण सामान्य मुलांप्रमाणे नव्हतं. वयाच्या ६-७ वर्षापासून त्यांनी काम केलं आणि त्यांनी कमावलेल्या पैशांवर त्यांचं घर चालायचं.”
अली यांच्या तिन्ही मुलींनी वयाच्या १५ व्या वर्षांपर्यंत खूप पैसा कमावला, ज्यामुळे त्यांनी चाळीतलं घर सोडून वांद्रे येथे घर खरेदी केलं. त्यावेळी त्यांच्या आई इक्बाल बेगम यांनी नृत्यांगणा म्हणून काम करणं थांबवलं होतं. त्यांना कर्करोगाचं निदान झालेलं आणि त्यांच्या वडिलांनीही संगीत क्षेत्रात काम करणं बंद केलं होतं.
मीना यांना शिकण्याची खूप इच्छा होती, पण त्यांच्या पालकांची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत. विनोद मेहता यांच्या पुस्तकानुसार मीना यांनी त्यात म्हटलं आहे की, सेटवर त्यांना जेव्हाही वेळ मिळत असे तेव्हा इतर मुलं बाहेर खेळण्यासाठी जात असत व त्या एका कोपऱ्यात बसून पुस्तकं वाचायच्या.
मीना यांनी नंतर अनेक चित्रपटांत काम केलं. त्यांनी ‘एक ही भूल’, ‘पूजा’, ‘अलाद्दीन’, ‘परिणीता’, ‘बंदीश’, ‘पाकिजा’, ‘मेरे अपने’, ‘दुश्मन’, ‘जवाब’, ‘गझल’ सारख्या चित्रपटांत काम केलं. मीना यांनी पार्श्वगायिका म्हणूनही काम केलं. त्यांनी १९४१ साली बहन चित्रपटासाठी पहिल्यांदा गाणं गायलेलं. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री म्हणून काम करणं सुरू ठेवलं.
मीना यांच्या मोठ्या बहिणीचं पुढे लग्न झालं आणि त्या या क्षेत्रापासून लांब गेल्या. त्यावेळी मीना मोठ्या झाल्या होत्या आणि नायिका म्हणून काम करू लागल्या होत्या. त्या आर्थिकृदृष्ट्या स्वतंत्र्य होत्या, परंतु त्यांना तसं कधीच स्वातंत्र्य अनुभवता आलं नाही. मीना यांनी कमाल अमरोही यांच्यासह लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, जो त्यांनी स्वत:साठी घेतलेला पहिला निर्णय होता. त्यांना माहीत होतं की त्यांचे वडील या लग्नासाठी कधीच तयार होणार नाहीत, त्यामुळे मीना व कमाल यांनी ठरवलं की जोवर त्या दोन लाख कमवून त्यांच्या वडिलांना देत नाही, तोवर हे गुपित ठेवूया.
स्वतः घेतलेल्या घरातून मीना कुमरी यांना वडिलांनी काढलेलं बाहेर
मीना यांच्या वडिलांना जेव्हा याबद्दल कळलं तेव्हा त्यांनी मीना यांना वेगळं व्हायला सांगितलं, पण त्यांनी यासाठी नकार दिला. त्या त्यांच्या घरातील कमावत्या असल्याने त्यांच्या वडिलांनी त्यांना कधीच घर सोडून जा असं सांगितलं नाही. पण, जेव्हा त्यांनी कमाल अमरोही यांच्यासह चित्रपटात काम करण्याचं ठरवलं, तेव्हा त्यांच्या वडिलांनी मीना यांच्यासाठी त्यांच्या घराचे दार बंद केले, जे घर मीना यांच्या कमाईतूनच खरेदी करण्यात आलेलं.
विनोद मेहता यांनी त्यांच्या पुस्तकात असं लिहिलं आहे की, मीना यांनी त्यांच्या वडिलांना पत्र लिहिलं होतं, ज्यामध्ये असं लिहिलं होतं की, “बाबूजी, जे काही झालं त्यानंतर मी तिथून बाहेर पडले, पण आपण कोर्टाच्या भानगडीत पडू नये. ते खूप बालिश ठरेल. मला तुमच्याकडून काहीही नकोय, फक्त माझे कपडे व पुस्तकं मला परत करा; जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा त्या गोष्टी पाठवून द्या.”
मीना कुमारी यांना ट्रॅजिडी क्वीन असंही म्हटलं जायचं. लहान वयातच वडिलांनी या क्षेत्रात काम करण्यासाठी आग्रह केला आणि मीना यांनीसुद्धा चांगल्या मुलीप्रमाणे कायमच त्यांच्या आजूबाजूला असलेल्या सर्वांना मदत केली, ज्यामुळे त्यांना तसं कधी काहीच मिळालं नाही.